नाशिक जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे 22 ऑगस्ट रोजी आयोजन

नाशिक। दि. २१ ऑगस्ट २०२६: नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांना स्थानिक खाद्यसंस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या रानभाज्यांमध्ये विविध पोषक घटक असून बदलत्या जीवनशैलीमध्ये नव्या पिढीला या पारंपरिक खाद्यसंपत्तीची ओळख करून देणे, तिचे महत्त्व पटवून देणे, संवर्धन व वापर वाढावा यासाठी कृषी विभाग व आत्मा, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता रामेती कॅम्पस, उंटवाडी रोड, नाशिक येथे नाशिक जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यु काशिद यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  सणासुदीत ग्राहकांना महागाईचा झटका; साखरेच्या दरात मोठी वाढ

निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या पौष्टिक व आरोग्यदायी रानभाज्यांची नागरिकांना ओळख होवून आहारातील महत्व या महोत्सवाच्या माध्यमातून समजणार आहे. या महोत्सवात आघाडा, अळू, आंबाडी, गुळवेल, चाकवत, चवळी, घोळ, करटोली, रानमेथी, माठ, शेवगा, भारंगी, भोकर, टाकळा आदी विविध स्थानिक रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात येणार असून त्यांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शेतकरी व महिला बचत गटांमार्फत रानभाज्यांची थेट विक्री करण्यात येणार असल्याने नागरिकांना ताज्या रानभाज्या खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन स्थानिक रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवरील 'या' हॉटेलचा परवाना निलंबित; एफडीएची कारवाई !

महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणून रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण व चविष्ट पदार्थांचे सादरीकरण स्पर्धकांना करता येणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास रु. ५ हजार, द्वितीय क्रमांक विजेत्यास रु. ३ हजार आणि तृतीय क्रमांक विजेत्यास रु. २ हजार रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांचाही गौरव करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  महासिंहस्थासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बचावकार्याची ‘मॉन्सून टेस्ट’; आनंदवल्ली घाटावर तात्पुरत्या सुविधांची चाचणी

नागरिकांना रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पारंपरिक व नाविन्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कुटुंबासह महोत्सवाला भेट देऊन पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घ्यावा. तसेच नाशिक शहर व परिसरातील नागरिक, महिला, युवक-युवती, विद्यार्थी, गृहिणी, खाद्यप्रेमी तसेच आरोग्यदायी व पारंपरिक आहाराविषयी उत्सुक असणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. माने व आत्माचे प्रकल्प संचालक श्री. काशिद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790