९ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात होणार सुनावणी
नाशिक। दि. २ ऑक्टोबर २०२६: केंद्र शासनाच्या किंमत स्थिरीकरण निधी (PSS) योजनेंतर्गत नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय नोडल संस्थांमार्फत हंगाम २०२६-२७ मध्ये कांदा खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या खरेदी प्रक्रियेदरम्यान अनियमितता, गैरव्यवस्थापन अथवा अन्य प्रकारच्या तक्रारी असल्यास संबंधित शेतकरी, कांदा उत्पादक, व्यापारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाच्या शासन निर्णयानुसार ही कांदा खरेदी प्रक्रिया सुरू आहे. खरेदी प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारची अनियमितता अथवा गैरव्यवस्थापन आढळल्यास त्याबाबतची तक्रार आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक कार्यालय, सहकार संकुल, मौलाना आझाद चौक, सारडा सर्कल, नॅशनल उर्दू हायस्कूलच्या बाजूला, नाशिक येथे दि. ८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावी. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे खुली सुनावणी (Open Hearing) आयोजित करण्यात आली आहे.
त्यामुळे शेतकरी, कांदा उत्पादक, लोकप्रतिनिधी व संबंधित नागरिकांनी आपल्या तक्रारींच्या आवश्यक कागदपत्रांसह खुल्या सुनावणीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
![]()


