भावली धरण परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला; महिलेचा विनयभंग, सोनसाखळी व मोबाईल लुटला

नाशिक। दि. १४ जुलै २०२६: इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाजवळील धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या नाशिकरोड येथील एका कुटुंबावर टवाळखोरांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या हल्ल्यात महिलेचा विनयभंग करण्यात आला असून तिचा मोबाईल तसेच तिच्या पतीच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून नेण्यात आली. कुटुंबाने घटनास्थळावरून पळ काढल्यानंतरही आरोपींनी कारचा पाठलाग करत वाहनाची तोडफोड केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पीडित कुटुंबाने मोबाईलमध्ये चित्रित केला असून तो पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांपैकी तिघांची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'गोल्ड मॅन' जबरी चोरी प्रकरणातील फरार आरोपी चार महिन्यांनंतर जेरबंद

या प्रकरणी नाशिकरोड येथील ४४ वर्षीय महिलेने तक्रार दिल्यानंतर सुरुवातीला अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र घटना इगतपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपासासाठी गुन्हा तेथे वर्ग करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, संबंधित महिला आपल्या पती, मुलगा, मुलगी, दीर आणि दोन पुतण्यांसह भावली धरण परिसरातील धबधबा पाहण्यासाठी गेल्या होत्या. धबधब्याकडे जात असताना दोन युवकांनी महिलेकडे पाहून अश्लील शिट्ट्या मारल्या. याचा जाब विचारताच तेथे उपस्थित असलेल्या सहा ते सात जणांच्या टोळीने कुटुंबीयांशी वाद घालत धक्काबुक्की आणि मारहाण सुरू केली. विरोध करणाऱ्या महिलेचे कपडे फाडून तिचा मोबाईल हिसकावण्यात आला. मोबाईल परत मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या पतीलाही मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लुटण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सोमवारी (दि. १३) विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन

घाबरलेल्या अवस्थेत कुटुंबाने कारने नाशिकच्या दिशेने प्रयाण केले. मात्र काही किलोमीटर अंतरावर (एमएच ४६ बीई ३७२१) क्रमांकाच्या पांढऱ्या कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करत ओव्हरटेक करून रस्ता अडवला. त्यानंतर हातातील लाकडी दंडुके, बेसबॉल स्टिक आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने कारच्या काचा फोडून वाहनाची तोडफोड करण्यात आली. काच फुटल्याने कारमधील कुटुंबीयांच्या अंगावर काचेचे तुकडे उडाले. याचवेळी एका आरोपीने महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; प्राणघातक हल्ल्यानंतर फरार पती परभणीतून अटकेत

तक्रारीनुसार, घोटी टोलनाका परिसरात आरोपींनी पुन्हा वाहन अडवून महिलेला कारबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. बेसबॉल स्टिकने तिच्या डोक्यावर वार करून जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रसंगावधान राखल्याने ती थोडक्यात बचावली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबळे आणि इगतपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक के. पी. भोजणे करीत आहेत.

या घटनेमुळे भावली धबधबा परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पर्यटनस्थळी पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी पर्यटकांकडून होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790