Amazon

नाशिक: पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने वार करणाऱ्या पतीला १० वर्षे सक्तमजुरी

नाशिक। दि. २८ ऑक्टोबर २०२६ : पत्नीला मोबाईल देण्याच्या बहाण्याने कुसुमाग्रज उद्यानात बोलावून तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच, पीडित पत्नीला एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. राजू पोपट मते (रा. शिंदेनगर, पेठरोड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

मोबाईल देण्याच्या बहाण्याने पत्नीला बोलावले:
ही घटना ६ फेब्रुवारी २०१७ रोजी घडली होती. आरोपी राजू मते याची पत्नी दिव्या माहेरी राहत होती. त्यावेळी आरोपीने तिला मोबाईल देण्याच्या बहाण्याने कुसुमाग्रज उद्यानात बोलावले. यावेळी आरोपीच्या साथीदाराने दिव्याच्या मैत्रिणीला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच संधीचा फायदा घेत राजूने ब्लेडने दिव्याच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात दिव्याला गंभीर दुखापत झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: इन्स्टाग्राम रीलद्वारे गुंतवणुकीचे आमिष दाखवून दोघांना १५ लाखांचा गंडा

या घटनेप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पतीसह त्याचा मित्र, सासू आणि दोन नणंदांविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयात खटला; पती दोषी, चौघांची निर्दोष मुक्तता:
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी. पी. मुंढे यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी युक्तिवाद केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सडक सुरक्षा मित्रांना अपघातग्रस्तांना मदतीचे प्रशिक्षण; ३२ युवक स्वयंसेवकांचा सहभाग

न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मुख्य आरोपी राजू मते याला दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच, एका महिन्याच्या आत पीडित महिलेला एक लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील अन्य चार आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकच्या टपाल कार्यालयात 5 नोव्हेंबर रोजी डाक अदालत

या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, महिला हवालदार रंजना गायकवाड, हवालदार सोमनाथ गावित आणि विक्रांत नागरे यांनी पाठपुरावा केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790