Amazon

नाशिक: रामकुंड आणि कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष ‘माय स्टॅम्प’चे ३१ ऑक्टोबरला अनावरण

नाशिक। दि. २८ ऑक्टोबर २०२६: सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या समृद्ध धार्मिक वारशाची ओळख देशभर पोहोचवण्यासाठी रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ या दोन पवित्र स्थळांवर आधारित विशेष टपाल तिकिटांची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय टपाल विभागाच्या ‘माय स्टॅम्प’ उपक्रमांतर्गत ही तिकिटे साकारण्यात आली असून, ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभ ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी त्यांचे अनावरण करण्यात येणार आहे. या माध्यमातून सिंहस्थाची आध्यात्मिक परंपरा, धार्मिक महत्त्व आणि नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सांस्कृतिक वारसा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होणार आहे.

रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ ही सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेतील दोन महत्त्वाची केंद्रे आहेत. वैष्णव आणि शैव परंपरांशी निगडित असलेल्या या दोन्ही तीर्थस्थळांचे महत्त्व लक्षात घेऊन विशेष टपाल तिकिटांसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. या तिकिटांमधून सिंहस्थातील विविध धार्मिक परंपरांचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल

रामकुंडातून वैष्णव परंपरेचे दर्शन:
नाशिकमधील रामकुंड हे वैष्णव संप्रदायाचे पवित्र स्नानस्थळ म्हणून ओळखले जाते. सिंहस्थ महाकुंभमेळ्यादरम्यान येथे अमृतस्नानाची परंपरा पार पडते. रामतीर्थाची ऐतिहासिक वास्तुरचना, तीर्थाचे पावित्र्य आणि सिंहस्थाशी असलेले अतूट नाते विशेष टपाल तिकिटावर चित्रित करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकच्या धार्मिक परंपरेतील या महत्त्वपूर्ण स्थळाचे वैशिष्ट्य टपाल तिकिटांच्या माध्यमातून देशभर पोहोचणार आहे.

कुशावर्त तीर्थातून शैव परंपरेचे दर्शन:
त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ हे सिंहस्थ महाकुंभमेळ्यादरम्यान शैव साधू-संतांच्या पवित्र स्नानाचे प्रमुख केंद्र आहे. या तीर्थाची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना आणि पार्श्वभूमीवरील ब्रह्मगिरी पर्वतरांग यांमधून परिसराचे धार्मिक आणि नैसर्गिक महत्त्व अधोरेखित होते. कुशावर्त तीर्थाच्या माध्यमातून सिंहस्थातील शैव परंपरेचा वारसा विशेष टपाल तिकिटावर साकारण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सडक सुरक्षा मित्रांना अपघातग्रस्तांना मदतीचे प्रशिक्षण; ३२ युवक स्वयंसेवकांचा सहभाग

रामकुंड आणि कुशावर्त तीर्थ या दोन्ही स्थळांना सिंहस्थाच्या परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. एकीकडे वैष्णव परंपरेतील पवित्र स्नानाचे प्रतीक असलेले रामतीर्थ, तर दुसरीकडे शैव परंपरेचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेले कुशावर्त तीर्थ, अशा दोन्ही स्थळांचा समावेश या उपक्रमात करण्यात आला आहे. त्यामुळे सिंहस्थ महाकुंभमेळ्यातील विविध आध्यात्मिक परंपरा आणि त्यांचा समृद्ध वारसा एका अनोख्या माध्यमातून मांडला जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत वेळेत मिळावी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंहस्थाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार:
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “सिंहस्थ महाकुंभमेळा हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या समृद्ध आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. रामकुंड आणि कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष टपाल तिकिटांच्या माध्यमातून या दोन्ही पवित्र स्थळांचे महत्त्व व्यापक स्तरावर पोहोचवता येणार आहे. टपाल तिकिटे ही केवळ पत्रव्यवहाराचे माध्यम नसून, देशाचा सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक ठेवा जतन करणारे प्रभावी माध्यम आहे. या उपक्रमामुळे सिंहस्थ महाकुंभमेळ्याची परंपरा आणि तीर्थस्थळांचे महत्त्व भावी पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.”

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790