नाशिक: ‘वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने व्यावसायिकाची ४५ लाख ५० हजारांची फसवणूक

नाशिक। दि. १७ सप्टेंबर २०२६: घरबसल्या ऑनलाइन काम करून मोठे कमिशन मिळवण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी शहरातील एका व्यावसायिकाला ४५ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन प्रॉपर्टींना चांगले रिव्ह्यू देण्याच्या टास्कच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी व्यावसायिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्ध आईची हत्या; मद्यपी मुलाला अटक

पोलिसांच्या माहितीनुसार, १६ जुलै ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपींनी टेलिग्रामच्या माध्यमातून तक्रारदाराशी संपर्क साधला. ऑनलाइन प्रॉपर्टींना सकारात्मक रिव्ह्यू दिल्यास दररोज चांगला परतावा मिळेल, असे सांगून त्यांना सुरुवातीला काही टास्क देण्यात आले.

यानंतर टास्क सुरू करण्यासाठी तक्रारदाराला एक लिंक पाठविण्यात आली. लिंक उघडल्यानंतर एका नामांकित रिअल इस्टेट कंपनीसारखे दिसणारे बनावट वेबपेज त्यांच्या समोर आले. या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर त्यांना टेलिग्रामवरील एका ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर रोडवर बेकायदा वृक्षतोड; महापालिकेच्या हाती सीसीटीव्ही फुटेज

या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या काही व्यक्तींनी विविध व्यवहारांचे स्क्रीनशॉट आणि कथित कमाईचे पुरावे दाखवत तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. अधिक पैसे गुंतवल्यास मोठा परतावा आणि दामदुप्पट कमिशन मिळेल, असा आभास निर्माण करण्यात आला.

या भूलथापांना बळी पडून तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यांमध्ये तब्बल ४५ लाख ५० हजार रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर त्यांना कोणताही नफा किंवा परतावा मिळाला नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पूजा आंबेकर खूनप्रकरणी दीराला फाशीची शिक्षा; ३५ वार करून केली होती हत्या

सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पैसे ज्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले तसेच टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क करणाऱ्या व्यक्तींची माहिती तपासली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790