नाशिक: पूजा आंबेकर खूनप्रकरणी दीराला फाशीची शिक्षा; ३५ वार करून केली होती हत्या

नाशिक। दि. १७ सप्टेंबर २०२६ : चार वर्षांपूर्वी झालेल्या पूजा संदीप आंबेकर यांच्या खूनप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी संतोष विष्णू आंबेकर (वय ३१, रा. पंचवटी) याला फाशीची शिक्षा सुनावली. आरोपीविरुद्ध यापूर्वीही विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्ध आईची हत्या; मद्यपी मुलाला अटक

३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री सुमारे ११ वाजता गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संत कबीरनगर येथे ही घटना घडली होती. पैशांच्या वादातून संतोष आंबेकर याने त्याची भावजय पूजा आंबेकर (वय २७) यांच्यावर धारदार हत्याराने तब्बल ३५ वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पूजा यांचा मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे 18 सप्टेंबर रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके

या घटनेनंतर पूजा यांच्या आई चंद्रभागा प्रकाश मेढे यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तपासादरम्यान अंमलदार सचिन सुपले यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता भानुप्रिया पेठकर आणि आर. पी. गावित यांनी साक्षीदारांचे जबाब, पंचनामे तसेच अन्य उपलब्ध पुरावे न्यायालयासमोर मांडले. या पुराव्यांच्या आधारे सरकारी पक्षाने प्रभावी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने संतोष आंबेकर याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790