नाशिक: चॉपरचा धाक दाखवत गणेश मंडळाकडून हप्ता वसुलीचा प्रयत्न; पाच दुचाकींची तोडफोड

नाशिक। दि. १७ सप्टेंबर २०२६: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाकडून हप्ता वसूल करण्यासाठी चॉपरचा धाक दाखवत गणेशभक्तांना धमकावल्याचा प्रकार रविवार पेठेतील घास बाजार परिसरात घडला. हप्ता न दिल्याच्या कारणातून संशयितांनी आरडाओरड, शिवीगाळ आणि दमदाटी करत पाच दुचाकींची तोडफोड केली. यावेळी दोघा मंडळ कार्यकर्त्यांच्या खिशातून एकूण १,८०० रुपये बळजबरीने काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घास बाजार येथे गंगावाडी भक्त मित्रमंडळाकडून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू आहे. सोमवारी (दि. १४) रात्री संशयित अवधूत जाधव, जयेश जाधव, राहुल दिघे आणि रोशन गांगुर्डे हे तेथे आले. यावर्षी मंडळाने हप्ता दिला नसल्याचे कारण सांगत त्यांनी परिसरात आरडाओरड आणि शिवीगाळ सुरू केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्ध आईची हत्या; मद्यपी मुलाला अटक

यावेळी तेथे उभ्या असलेल्या एका दुचाकीची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये काही काळ गोंधळ आणि धावपळ उडाली. त्यानंतर अवधूत जाधव याने चॉपरचा धाक दाखवत मंडळाचा हप्ता देण्याची मागणी केली. फिर्यादी विशाल आहेर (वय ४१, रा. गंगावाडी) यांच्या शर्टाच्या खिशातून १,२०० रुपये बळजबरीने काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम; आधार माहिती अद्यावत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

दरम्यान, मंडळ कार्यकर्ता शुभम यालाही धमकावून त्याच्या खिशातून ५०० रुपये काढून घेण्यात आले. शुभमने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी रस्त्यावरील दगड उचलून त्याच्या दिशेने फेकल्याचा आरोप आहे. या प्रकारात मंडळातील काही अन्य कार्यकर्त्यांनाही किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.

यानंतर संशयितांनी परिसरातील एकूण पाच मोटारसायकलींची तोडफोड केली. या घटनेत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध खंडणी आणि जबरी लूट यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ( सरकारवाडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २३६/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790