नाशिक: सिमकार्ड गैरवापराच्या नावाखाली वृद्धाची १९ लाखांची ऑनलाइन फसवणूक

नाशिक। दि. १७ मे २०२६: सिमकार्डचा गैरवापर झाल्याची भीती दाखवत आणि स्वतःला मुंबई क्राइम ब्रँच व डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाचे अधिकारी असल्याचे सांगून सायबर भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १९ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ६४ वर्षीय वृद्ध असून, १६ ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत त्यांना विविध व्हॉट्सअॅप क्रमांकांवरून संदेश व कॉल करण्यात आले. संबंधितांनी स्वतःला डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया तसेच मुंबई क्राइम ब्रँचमधील अधिकारी असल्याचे भासवले.

सायबर भामट्यांनी फिर्यादीच्या आधारकार्डवर घेतलेल्या सिमकार्डचा गैरवापर होत असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणात पीएफआय संघटनेचाही संबंध असल्याचे सांगून वृद्धाला घाबरवण्यात आले. चौकशीसाठी आर्थिक व्यवहार, बँक खात्यांची माहिती आणि स्थावर मालमत्तेचा तपशील देण्यास भाग पाडण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील ‘या’ महत्वाच्या भागांत गुरुवारी (दि. ११ जून) वीजपुरवठा बंद राहणार…

यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या खात्यातील १९ लाख रुपयांची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यास सांगितले. अधिकाऱ्यांच्या नावाखाली विश्वास संपादन करून ही रक्कम ऑनलाइन पद्धतीने उकळण्यात आली.

फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर वृद्धाने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून संबंधित व्हॉट्सअॅप क्रमांक आणि बँक खात्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790