नाशिक। दि. २९ नोव्हेंबर २०२६: शहरात सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार सुरूच असून, आता ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवणुकीचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. बनावट पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना तब्बल ६४ लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत सायबर गुन्हेगारांनी चार वेगवेगळ्या व्हॉट्सॲप क्रमांकांवरून फिर्यादीशी संपर्क साधला. ७ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधत मनी लॉण्ड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई होण्याची भीती दाखवून तपासाच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण १८ लाख रुपये ऑनलाइन पाठविण्यास भाग पाडण्यात आले.
या प्रकरणी शहर सायबर पोलिसांनी ज्या बँक खात्यांमध्ये फसवणुकीची रक्कम जमा झाली, त्या खात्यांच्या धारकांसह संबंधित मोबाइल क्रमांकांची सिमकार्ड ज्यांच्या नावावर आहेत, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेतही सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे भासवून फिर्यादीला अटकेची धमकी दिली. यासाठी संशयितांनी तब्बल नऊ वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांचा वापर करून फिर्यादीशी संपर्क साधला. गुन्ह्यात अडकविण्याची आणि अटक करण्याची भीती दाखवत त्यांच्याकडून तब्बल ४६ लाख रुपये उकळण्यात आले.
दोन्ही घटनांमध्ये एकाच प्रकारच्या भीतीचा वापर करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. बनावट पोलीस अधिकारी किंवा तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांना घाबरविणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
![]()


