🌞 आजचे तापमान- किमान: 18.8°C । कमाल: 33.3°C

नाशिक: जॉगिंग ट्रॅकवर नाशिक पोलिसांचा नागरिकांशी थेट संवाद; समस्या आणि सूचनांची घेतली दखल

नाशिक। दि. २९ नोव्हेंबर २०२६ : नागरिकांच्या दैनंदिन समस्या जाणून घेण्यासह शहरातील सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर थेट संवाद साधण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी विशेष उपक्रम राबविला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून शनिवारी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जॉगिंग ट्रॅकवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमात पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जॉगिंगसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी आणि अन्य नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या परिसरातील समस्या, अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी २८ व २९ नोव्हेंबरला विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन

संवादादरम्यान नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेतील अडचणी, सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षितता, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसह विविध स्थानिक प्रश्न मांडले. नागरिकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना आणि कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी पोलिसांकडून विविध आपत्कालीन मदत क्रमांकांची माहितीही देण्यात आली. आपत्कालीन मदतीसाठी ११२, महिला सुरक्षेसाठी १०९१, बालकांच्या मदतीसाठी १०९८, तर सायबर गुन्हे आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीची तक्रार नोंदविण्यासाठी १९३० या हेल्पलाइन क्रमांकांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये लष्करी हेलिकॉप्टर आणि ड्रोन वैमानिकांचा दीक्षांत समारंभ उत्साहात

पोलीस आणि नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी करणे, नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणे आणि परस्पर विश्वासाचे नाते दृढ करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नाशिक शहर पोलीस कटिबद्ध असून, यापुढेही अशा नागरिकाभिमुख उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर धरण समुहातून शेतीसाठी चार आवर्तने; रब्बी व उन्हाळी हंगामातील पाणी आवर्तनांचे नियोजन

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे, सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790