🌞 आजचे तापमान- किमान: 14.6°C । कमाल: 33.1 °C

थकीत ई-चलनांच्या दंडात २० टक्के सवलत; १ डिसेंबरपासून अभय योजना लागू

नाशिक | दि. २८ नोव्हेंबर २०२६: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रलंबित असलेल्या ई-चलनांच्या दंड रकमेत वाहनचालकांना आता २० टक्के सवलत मिळणार आहे. राज्य सरकारने ‘महाराष्ट्र वाहतूक पोलिस चलान अभय योजना-२०२६’ जाहीर केली असून, १ डिसेंबर २०२६ पासून या योजनेची राज्यभर अंमलबजावणी होणार आहे. गृह विभागाने शुक्रवारी (दि. २७) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे.

वाहतूक नियमभंगाची केवळ ई-चलन जारी करून न थांबता प्रत्यक्ष दंडवसुली होणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने ४ नोव्हेंबर रोजी या अभय योजनेला मंजुरी दिली होती. त्यानुसार वाहनचालकांना थकीत दंड भरण्यासाठी तीन वेगवेगळ्या टप्प्यांत सवलत दिली जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाची आत्महत्या; ७० हजारांच्या बदल्यात भरले तीन लाखांचे व्याज

तीन टप्प्यांत मिळणार २० टक्के सवलत:
१. पहिला टप्पा – प्रलंबित चलनांसाठी एकवेळची सवलत
:
२१ जानेवारी २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जारी झालेली आणि योजना सुरू होताना थकीत असलेली पात्र ई-चलने या टप्प्यात समाविष्ट असतील. अशा चलनांवरील दंडाची रक्कम २० टक्के सवलतीसह भरण्याची सुविधा मिळेल. मात्र, योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत दंड भरावा लागेल.

२. दुसरा टप्पा – नवीन चलनांवर लवकर भरण्याची सवलत:
१ डिसेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२७ या एक वर्षाच्या कालावधीत जारी होणाऱ्या पात्र ई-चलनांवरही २० टक्के सवलत मिळणार आहे. यासाठी संबंधित चलन जारी झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे बंधनकारक असेल.

३. तिसरा टप्पा – न्यायालयात प्रलंबित असलेल्या चलनांसाठी सवलत:
३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत जारी झालेली आणि सक्षम न्यायालय किंवा आभासी न्यायालयात प्रलंबित असलेली पात्र ई-चलनेही या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्येही दंडाच्या रकमेत २० टक्के सूट मिळेल. यासाठी योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी २८ व २९ नोव्हेंबरला विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन

कोणत्या चलनांना मिळणार सवलत?
वाहतूक पोलिस विभागातील अधिकारी-कर्मचारी किंवा पोलिसांच्या अधिकृत इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे जारी करण्यात आलेल्या तडजोडपात्र (कंपाउंडेबल) ई-चलनांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. परिवहन विभागाने जारी केलेली चलने या योजनेत समाविष्ट नसतील.

एखाद्या ई-चलनात तडजोड न करता येणारा (नॉन-कंपाउंडेबल) गुन्हा समाविष्ट असल्यास संबंधित संपूर्ण चलन सवलतीसाठी अपात्र ठरेल. तसेच रद्द झालेली किंवा निकाली निघालेली चलने या योजनेच्या कक्षेत येणार नाहीत. यापूर्वीच भरलेल्या दंडाच्या रकमेतून कोणताही परतावा दिला जाणार नाही.

🔎 हे वाचलं का?:  महावितरणच्या अभय योजनेमध्ये ५४ हजार वीजग्राहकांचा सहभाग; ‘अर्ली बर्ड’ सवलतीसाठी आता २० दिवस शिल्लक

मुदत संपल्यानंतर कठोर कारवाई:
या योजनेचा लाभ जास्तीत जास्त वाहनचालकांपर्यंत पोहोचावा, यासाठी रस्ता सुरक्षा निधीतून व्यापक जनजागृती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याशिवाय तडजोडपात्र वाहतूक गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी पोलिस शिपायांनाही अधिकार देण्यात आले आहेत.

दरम्यान, अभय योजनेची मुदत संपल्यानंतरही दंडाची थकबाकी न भरणाऱ्या तसेच वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये वाहनचालकाचा परवाना निलंबित करणे, वाहनविषयक व्यवहारांवर निर्बंध आणणे आणि वाहन जप्त करण्यासारख्या कारवाईचा समावेश आहे.

त्यामुळे प्रलंबित ई-चलनांचा दंड असलेल्या वाहनचालकांसाठी ही योजना आर्थिक दिलासा देणारी ठरणार असून, दिलेल्या मुदतीत सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790