🌞 आजचे तापमान- किमान: 18.8°C । कमाल: 33.3°C

नाशिकमध्ये लष्करी हेलिकॉप्टर आणि ड्रोन वैमानिकांचा दीक्षांत समारंभ उत्साहात

नाशिक। दि. २९ नोव्हेंबर २०२६: भारतीय लष्कराच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (CAATS), नाशिक रोड येथे हेलिकॉप्टर आणि रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम (RPAS) अर्थात मानवरहित ड्रोन विमान प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या वैमानिकांचा संयुक्त दीक्षांत समारंभ दिमाखात पार पडला.

भारतीय लष्कराच्या आर्मी एव्हिएशन विभागाचे महासंचालक तथा कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार (SM) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या संचलनाचे निरीक्षण करून समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले.

या सोहळ्यात आर्मी एव्हिएशन यंग ऑफिसर्स कोर्स (YOs) च्या पहिल्या तुकडीतील अधिकारी तसेच हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर्स कोर्स (AHIC-45) पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, आर्मी एव्हिएशनच्या यंग ऑफिसर्स कोर्समधील अधिकाऱ्यांना प्रथमच या प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्थेतून अधिकृत ‘एव्हिएशन विंग्स’ प्रदान करण्यात आले. हा भारतीय लष्करी विमानन क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  महावितरणच्या अभय योजनेमध्ये ५४ हजार वीजग्राहकांचा सहभाग; ‘अर्ली बर्ड’ सवलतीसाठी आता २० दिवस शिल्लक

लष्करप्रमुखांनी मंजूर केलेल्या महत्त्वपूर्ण मनुष्यबळ धोरणात्मक बदलांच्या पार्श्वभूमीवर हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या बदलांमुळे लष्करी वैमानिकांसाठी पूर्वी अस्तित्वात असलेली ‘फॉलबॅक आर्म’ संकल्पना रद्द करण्यात आली आहे. लष्कराच्या आर्मी एव्हिएशन विभागाचे आधुनिकीकरण आणि विस्तार लक्षात घेऊन तरुण अधिकाऱ्यांना सुरुवातीपासूनच विशेष लष्करी विमानन प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. हेलिकॉप्टर आणि RPAS या दोन्ही प्रशिक्षण शाखांना एकाच व्यासपीठाखाली आणण्यात आले आहे.

या दीक्षांत तुकडीत महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. याशिवाय हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर्स कोर्समधील अधिकारी, भारतीय तटरक्षक दलाचे प्रशिक्षणार्थी तसेच मित्रदेशांतील परदेशी प्रशिक्षणार्थींनीही आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून दोघांना ६४ लाखांचा गंडा; बनावट पोलिसांकडून ऑनलाइन फसवणूक

नव्याने विकसित करण्यात आलेल्या प्रशिक्षण पद्धतीनुसार अधिकाऱ्यांना कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच विमानन प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे लष्करी विमानन क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्ये आणि युद्धभूमीवरील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे.

नव्या वैमानिकांचे अभिनंदन करताना लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांनी त्यांना व्यावसायिक उत्कृष्टतेचे सर्वोच्च निकष कायम राखण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरलेले ‘अव्हिएशन शक्ती’ हे प्रात्यक्षिक होते. यामध्ये लष्कराची हेलिकॉप्टर्स, मानवरहित ड्रोन प्रणाली (RPAS) आणि जमिनीवरील लष्करी तुकड्यांनी एकत्रितपणे विविध लष्करी मोहिमांचे सादरीकरण केले. आधुनिक युद्धभूमीवर मानवी वैमानिकांद्वारे नियंत्रित विमाने आणि मानवरहित यंत्रणा एकत्रितपणे कशा प्रकारे कार्य करू शकतात, याचे प्रभावी दर्शन या प्रात्यक्षिकातून घडले. तसेच तिन्ही संरक्षण दलांमधील समन्वय आणि संयुक्त कार्यपद्धतीचे महत्त्वही अधोरेखित झाले.

🔎 हे वाचलं का?:  थकीत ई-चलनांच्या दंडात २० टक्के सवलत; १ डिसेंबरपासून अभय योजना लागू

भारतीय लष्करातील सर्वात तरुण दलांपैकी एक असलेल्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्ससाठी हा समारंभ महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला. भविष्यातील युद्धभूमीवरील आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाणारे आधुनिक आणि तंत्रज्ञानस्नेही लष्करी वैमानिक घडविण्याच्या CAATS च्या कटिबद्धतेची यानिमित्ताने प्रचिती आली.

यावेळी महासंचालक तथा कर्नल कमांडंट यांनी CAATS चे कमांडंट, प्रशिक्षकवर्ग आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांच्या समर्पण, व्यावसायिक कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षणासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल विशेष कौतुक केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790