🌞 आजचे तापमान- किमान: 14.6°C । कमाल: 33.1 °C

महावितरणच्या अभय योजनेमध्ये ५४ हजार वीजग्राहकांचा सहभाग; ‘अर्ली बर्ड’ सवलतीसाठी आता २० दिवस शिल्लक

नाशिक/मुंबई, दि. २८ नोव्हेंबर २०२६: कायमस्वरूपी व तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी वीजग्राहकांना थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘अभय योजना २०२६-२७’ ला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या २० दिवसांत राज्यभरातील ५४ हजार ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला असून ८ कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला आहे. दरम्यान, मूळ थकबाकीमध्ये २० टक्क्यांपर्यंत सवलत देणाऱ्या ‘अर्ली बर्ड’ मुदतीसाठी येत्या १५ डिसेंबरपर्यंत आता फक्त २० दिवस शिल्लक आहेत.

लघु व उच्चदाबाच्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी ग्राहकांना मोठा दिलासा देणारी ही योजना येत्या १५ जानेवारी २०२७ पर्यंत सुरू राहणार आहे. थकबाकीमुक्तीसाठी घसघशीत सवलतींचा समावेश असणाऱ्या अभय योजनेअंतर्गत एकूण थकबाकीमधील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार तसेच मागणी आकार / स्थिर आकार १०० टक्के माफ करण्यात येत आहे. यासह मागणीनुसार नवीन वीजजोडणी किंवा पुनर्जोडणी देखील तात्काळ मिळणार आहे. तसेच सर्व ग्राहकांसाठी नवीन वीजजोडणी किंवा पुनर्जोडणी शुल्क आणि लघुदाब ग्राहकांसाठी सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येत आहे. योजनेत मूळ थकबाकीची रक्कम एकाचवेळी किंवा व्याजमुक्त हप्त्यांनी भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाची आत्महत्या; ७० हजारांच्या बदल्यात भरले तीन लाखांचे व्याज

‘अर्ली बर्ड’ सवलतीचा लाभ घेण्यासाठी २० दिवसांची संधी- अभय योजना सुरू झाल्यापासून दि. १५ डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष ‘अर्ली बर्ड रिबेट’ देण्यात येत आहे. या सवलतीच्या लाभासाठी आता केवळ २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांना वीजजोडणी खंडित राहण्याच्या कालावधीनुसार १० ते २० टक्क्यांपर्यंत, तर इतर लघु व उच्चदाब ग्राहकांना १० ते १५ टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. तसेच मंजूर भार २० किलोवॉटपर्यंत असलेल्या ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’चा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीत आणखी ५ टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे व ती रक्कम थेट प्रीपेड मीटर खात्यात जमा होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ महाकुंभमेळा: संभाव्य धोके, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आपत्कालीन प्रतिसादावर चर्चा

अभय योजनेत आतापर्यंत ५४ हजार ३२५ थकबाकीदार ग्राहकांनी सहभाग घेतला आहे. संपूर्ण व्याज, विलंब आकारासह मागणी/स्थिर आकार १०० टक्के माफ झाल्यानंतर उर्वरित मूळ थकबाकीमधील ८ कोटी २७ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक कोकणातून प्रतिसाद मिळाला असून कोकण प्रादेशिक विभागातील १९ हजार ६२८ थकबाकीदारांनी सहभागी होत १ कोटी ८६ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील १६ हजार ८२ थकबाकीदारांनी २ कोटी ५७ लाख, पुणे प्रादेशिक विभागातील १३ हजार २२६ थकबाकीदारांनी २ कोटी ५२ लाख आणि नागपूर प्रादेशिक विभागातील ५ हजार ३८९ थकबाकीदारांनी १ कोटी ३४ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: १०९ बंद गोदामे व कारखान्यांची पोलिसांकडून तपासणी; अंमली पदार्थांचा शोध

अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल अॅपद्वारे घरबसल्या अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. उर्वरित २० दिवसांत ‘अर्ली बर्ड’ सवलतीचा जास्तीत जास्त बिगरकृषी थकबाकीदार ग्राहकांनी लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790