नाशिक। दि. २३ नोव्हेंबर २०२६ : विवाहितेचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवीगाळ, मारहाण आणि धमकावण्यासह दिराकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे. तसेच पतीकडून लैंगिक छळ होत असल्याचेही तिने नमूद केले आहे.
फिर्यादी महिला २ जुलै २०२१ पासून निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे सासरी राहत होती. या कालावधीत पती, सासू, सासरे, नणंद, दीर आणि मामेसासू यांनी संगनमताने वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच हाताने मारहाण करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
याशिवाय, दिराने पाठीमागून पकडून मिठी मारली आणि आपल्याला आवडत असल्याचे सांगत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. पतीकडून लैंगिक छळ होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या सततच्या त्रासामुळे आपला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ झाल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव आणि सचिन चव्हाण करीत आहेत.
![]()


