नाशिक। दि. २४ जुलै २०२६: शहर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकला गुरुवारी पूरस्थितीचा सामना करावा लागला. अवघ्या २४ तासांत १३५ मिमी पावसाची नोंद झाली असून, गंगापूर धरणातील पाणीसाठा केवळ १५ तासांत सुमारे २२ टक्क्यांनी वाढत ९७ टक्क्यांवर पोहोचला. वाढती आवक लक्षात घेऊन धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला मोठा पूर आला आणि शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले.
बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली, अनेक ठिकाणी कोंडी निर्माण झाली आणि काही वाहनांमध्ये पाणी शिरल्याने ती अडकून पडली. इंदिरानगर, पाथर्डी, सिडकोसह विविध भागांतील घरांमध्ये पाणी घुसल्याच्या घटनाही घडल्या. पावसाचा फटका उद्योग-व्यवसायांनाही बसला, तर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प होती.
बचावकार्य आणि स्थलांतर:
गोदावरी नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या दोन नागरिकांची आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सुखरूप सुटका केली. गणेशवाडी आणि मिलिंदनगर परिसरातील सुमारे १०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. काझीगढी येथे चार घरे कोसळली, तर पंचवटीतील काळाराम मंदिराजवळील एक पुरातन वाडा कोसळला. या सर्व घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गोदाकाठावरील भाग पाण्याखाली:
धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे गोदावरीची पाणीपातळी वेगाने वाढली. रामसेतू पूर्णपणे पाण्याखाली गेला, तर पुराचे पाणी भांडी बाजारापर्यंत पोहोचले. शहरातील पूरस्थितीचा पारंपरिक मापक मानला जाणारा दुतोंड्या मारुतीही पाण्याखाली गेला. रामकुंड परिसरातील घाट, पायऱ्या आणि नदीकाठावरील अनेक भाग जलमय झाल्याने नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
भांडी बाजार आणि सराफ बाजार परिसरात पाणी पोहोचताच व्यापाऱ्यांनी तातडीने दुकाने बंद करून माल सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली. दुपारच्या सुमारास पाणी काही दुकानांपर्यंत पोहोचल्याने मोठी धावपळ उडाली. सुमारे तासभर ही परिस्थिती कायम राहिल्यानंतर पाण्याचा ओघ कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वाहतूक आणि वीजपुरवठ्यावर परिणाम:
दिवसभरात शहरात झाडे पडण्याच्या तब्बल ५१ घटना घडल्या. अनेक ठिकाणी झाडे वाहनांवर कोसळल्याने नुकसान झाले, तर काही प्रमुख मार्गांवर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मालवाहतूक, सिटी लिंक बस आणि शालेय बससाठी महत्त्वाचे असलेल्या मार्गांवर पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागला. काही वाहनचालकांना मार्ग बंद असल्याने माघारी फिरावे लागले.
झाडे आणि फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळल्यामुळे अंबड, सातपूरसह विविध भागांतील ३३ केव्ही आणि ११ केव्ही वीजयंत्रणेला फटका बसला. त्यामुळे काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. विशेषतः रामकुंड परिसरात सुमारे आठ तास वीजपुरवठा बंद होता. महावितरणने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करून बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत केल्याचा दावा केला आहे.
दारणा धरणातूनही विसर्ग वाढला:
गंगापूर धरणासह दारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज ऑरेंज अलर्ट:
गुरुवारी दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने शुक्रवारी नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिल्यास धरणातून विसर्ग आणखी वाढविण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून, गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
![]()


