‘शिवसेना, सत्कार्य’चे आंदोलन

नाशिक, दि. ११ मे २०२५ (प्रतिनिधी): अनेकदा निवेदने देवूनही महापालिकेकडून दखल घेतली गेली नाही. तिडकेनगर, कर्मयोगीनगरमध्ये आज रविवारी थोड्याशा पावसाने नागरिकांच्या घरांमध्ये पाणी गेले. सोसायट्यांवर धोकादायक झाडे कोसळली. यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. त्वरित उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे.

कर्मयोगीनगर, जगतापनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, सद््गुरू नगर, गोविंदनगरसह संपूर्ण प्रभाग २४ मध्ये रविवारी अर्ध्यातासाच्या पावसाने अक्षरश: दाणादाण उडाली, महापालिकेच्या निष्क्रियतेचे पितळ उघडे पडले. तिडकेनगर येथील स्वस्थी अपार्टमेंटच्या भिंतीवर आणि कार पार्किंगच्या शेडवर चार दिवसात दुसर्यांदा सिल्व्हर ओकचे धोकादायक झाड कोसळले. सुदैवाने जीवितहानी टळली. इमारतीच्या आवाराच्या भिंतीला तडा गेला. पावसाळी गटारची कामे झालेली नसल्याने व पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजना केल्या नसल्याने कालिका पार्क, जगतापनगर, बोंबले मळा, कोठावळे मळा, कर्मयोगीनगरसह ठिकठिकाणी रस्त्यांचे अक्षरश: तळे झाले होते, यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी गेले.
कोठावळे मळ्यात नाल्याच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने सुरू असून, नाल्याला बांध घालून पाणी अडविले गेल्याने हे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये गेले. इमारतीच्या पायासाठी खोदलेला दहा-बारा फुटाचा भूखंड पाण्याने भरून गेला, यामुळे धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात महापालिका बांधकाम विभाग व उद्यान विभागाला यापूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने निवेदने दिली आहेत. तरीही त्याची दखल न घेतल्याने ही परिस्थिती उद््भवली. त्रस्त झालेले संतप्त रहिवाशी रविवारी रस्त्यावर उतरले. पावसाळी गटारची कामे करा, धोकादायक झाडे काढा, चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या नाल्याच्या संरक्षक भिंतीचे काम थांबवून या कामाची चौकशी करा, नाल्यातून पावसाचे पाणी सहज जाण्यासाठी उपाययोजना करा आदी मागण्या करीत नागरिकांनी घोषणाबाजी केली, बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला.
या सर्व ठिकाणी उद्या सोमवारीच पाहणी करून उपाययोजना केल्या जातील, असे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितले. या आंदोलनावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), प्रथमेश पाटकर, संजय काठावदे, मयुर कोठावदे, योगेश येवला, सुधाकर भदाणे, प्रशांत देसले, उद्धव अहिरे, मधुकर पाटील, माधवी येवला, स्मिता भदाणे, अनिल रिकामे, उमेश फडतरे, सनी जव्हेरी, राजेंद्र येवला, श्रीकृष्ण पाटील, दादाजी भामरे, डॉ. प्रताप कोठावळे, राजेंद्र अमलुक, रामनाथ जाधव, दीपक कुंभार आदी हजर होते.
वारंवार विद्युत पुरवठा खंडित
धोकादायक झाडे व फांद्या विद्युत तारांवर कोसळत असल्याने या भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपासून मध्यरात्री एक वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता. आज रविवारी दुपारी तीन वाजेनंतर रात्री उशीरापर्यंत हीच स्थिती होती, यामुळे रहिवाशी संतप्त झाले आहेत.