नाशिक: ‘हरित नाशिक’ लोकचळवळ व्हावी; मिशन ग्रीन मॉन्सूनअंतर्गत एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

नाशिक। दि. २८ जून २०२६: वाढते तापमान, अल निनोचे संकट आणि पर्यावरण संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ‘हरित कुंभ – हरित मॉन्सून’ अभियानाला रविवारी (दि. २८) प्रारंभ झाला. या अभियानांतर्गत २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत एक लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी होत ‘हरित नाशिक’ ही लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत मंगळवारी (दि. २५) वीजपुरवठा बंद राहणार !

फाशीचा डोंगर परिसरात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

महाजन म्हणाले, नाशिकच्या गोदावरी, नंदिनी आणि कपिला या नद्या शहराची ओळख असून त्यांचे पावित्र्य आणि स्वच्छता जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करावे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे टाळावे आणि इंदूरच्या धर्तीवर स्वच्छतेची सवय अंगीकारावी, असे त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: २८ ते ३० ऑगस्ट सिंहस्थ 'महाकुंभ भक्ती संगम'चे आयोजन

मिशन ग्रीन मॉन्सून अभियानांतर्गत लावण्यात येणाऱ्या एक लाख रोपांच्या संवर्धनाची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. आगामी कुंभमेळा स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी राज्य शासन विविध पायाभूत सुविधा विकसित करत असून, गोदावरी नदी स्वच्छ व बारमाही करण्यासाठी मलजल शुद्धीकरण प्रकल्प तसेच रस्ते विकासाची कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १५ सप्टेंबर रोजी त्रैमासिक बैठक

अल निनोच्या संभाव्य परिणामांचा उल्लेख करत त्यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचेही आवाहन केले.

दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कपिला नदी महास्वच्छता अभियानही राबविण्यात आले. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, एनसीसी विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हिरवाडी परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790