
नाशिक, दि. २८ जून २०२६: महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे रामसर स्थळ असलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात रविवारी (दि. २८) पावसाळापूर्व पक्षी प्रगणना उत्साहात पार पडली. या प्रगणनेत ६० हून अधिक पक्षी प्रजातींची आणि एकूण ६,२१५ पक्ष्यांची नोंद करण्यात आली.
वन विभागाच्या वतीने आयोजित या प्रगणनेत सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत विविध स्वयंसेवी संस्था, पक्षीमित्र, स्थानिक नागरिक आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या नाशिक ते नांदूर मध्यमेश्वर सायकल रॅलीत सुमारे ११० सायकलस्वार सहभागी झाले. रॅलीदरम्यान नागरिकांना पर्यावरण संरक्षण, प्रदूषणमुक्ती आणि पक्षी संवर्धनाचा संदेश देण्यात आला. अमित घुगे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.
प्रगणनेत ४,७७८ पाणथळ पक्षी आणि १,४३७ झाडांवरील पक्षी अशी नोंद झाली. चित्रबलाक, चमचा, हळदीकुंकू बदक, जांभळी पाणकोंबडी, गडवाल, राखी बगळा, उघड्या चोचीचा करकोचा, शेराटी, पांढऱ्या मानेचा करकोचा, लहान पाणकावळा, खंड्या, बिटर्न, नदीसुराय, वारकरी आणि कापशी बदक यांसह अनेक दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आढळून आले.
ही पक्षी प्रगणना उपवनसंरक्षक (वन्यजीव) कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वन कर्मचारी, निसर्ग मार्गदर्शक, स्वयंसेवक आणि पक्षीमित्रांनी माहिती संकलन व प्रगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला.
वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या अधिवास संवर्धन आणि संरक्षणाच्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम या प्रगणनेत दिसून आले आहेत. नांदूर मध्यमेश्वरात आता केवळ हंगामी नव्हे, तर वर्षभर विविध पक्षी प्रजातींचे दर्शन होत असून पक्षीप्रेमींनी अभयारण्याला अवश्य भेट द्यावी.
![]()


