बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

नाशिक। दि.२५ जुलै २०२६: बनावट शालार्थ आदेशांच्या माध्यमातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या बहुचर्चित प्रकरणात नाशिकरोड पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर (वय ६६) यांना धुळे येथून अटक करण्यात आली असून, या घोटाळ्यातील हा पाचवा अटक केलेला संशयित आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

तपासानुसार, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ५८७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कोणताही अधिकृत प्रस्ताव किंवा वैयक्तिक मान्यता नसताना बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आले. या बनावट आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत माहिती नोंदवून संबंधितांना वेतन आणि इतर आर्थिक लाभ मिळवून देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे शासनाची सुमारे ₹१६० कोटींची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

या प्रकरणात मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आदींसह अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासादरम्यान हिंगोणेकर हे २०११ ते २०१७ या कालावधीत जळगाव जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. त्याच काळात २५१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणताही वैध प्रस्ताव नसताना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हिंगोणेकर धुळे येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

आतापर्यंत पाच जणांना अटक:
शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात यापूर्वी तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, किरण पाटील, राहुल पवार आणि प्रशांत वाडिले यांना अटक करण्यात आली होती. हिंगोणेकर यांच्या अटकेनंतर अटक झालेल्या संशयितांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790