नाशिक: भारतीय स्टेट बँकेच्या शासकीय व्यवहारांच्या शाखा 31 मार्चला मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार

नाशिक। दि. २१ मार्च २०२६: वित्तीय वर्षाचे शासनाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेची कोषागार शाखा, नाशिक रोड व देवळाली कॅम्प शाखा तसेच तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असणाऱ्या उपकोषागार शासकीय व्यवहारास प्राधिकृत केलेल्या स्टेट बँकेची शाखा व बँक ऑफ बडोदाची सुरगाणा शाखा महावीर जयंती निमित्त सार्वजनिक सुटीच्या दिवशी, मंगळवार 31 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम क्रमांक 409 अन्वये निर्गमित केले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

वित्त विभागाच्या 13 मार्च 2026 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये आहरण व संवितरण अधिकारी यांनी कोषागारे/ उपकोषागार कार्यालये सुरू आहेत तोपर्यंत मुख्यालयात उपस्थित रहावे व प्राप्त निधी/ अनुदान व्यपगत होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच उपकोषागर कार्यालये 31 मार्च 2026 रोजी सांयकाळी 6 वाजेनंतर देयक स्वीकृत करीत नसल्याने सुधारीत अंदाजपत्रक व पुरवणी मागणीद्वारे प्राप्त अनुदानातून वैयक्तिक लाभाच्या मोठ्या रकमेची देयके महसूल विभाग, कृषी विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग इत्यादी विभागांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयांकडून तालुका स्तरावर अनुदान वाटप करून उप कोषागार कार्यालयात वर्ष अखेरीस सादर केली जातात. उप कोषागार कार्यालय स्तरावर एकच लिपिक व सहाय्यक लेखाधिकारी/ उप लेखापाल कार्यरत असल्याने अशा देयकांची छानणी करण्यावर मर्यादा येतात व अनियमितता घडण्याचा संभव असतो. त्यामुळे अशी देयके उप कोषागार कार्यालयात सादर न करता जिल्हा कोषागार कार्यालयातच सादर करण्यात यावीत, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी आदेशित केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

त्या अनुषंगाने वर नमूद स्टेट बँक शाखांसह बँक ऑफ बडोदा, सुरगाणा शाखा 31 मार्च 2026 रोजी उशिरा रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790