नाशिकमध्ये डेंग्यूचा डंख; १० सप्टेंबरपासून ३०० हून अधिक पथकांची तपासणी मोहीम

नाशिक। दि. १० सप्टेंबर २०२६: पावसाळ्यामुळे शहरात डासजन्य आजारांचा धोका वाढला असून, यंदा आतापर्यंत डेंग्यूचे ११२ रुग्ण आढळले आहेत. जूननंतर रुग्णसंख्येत झालेली वाढ लक्षात घेता नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व मलेरिया विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे. त्याअंतर्गत १० ते २० सप्टेंबरदरम्यान ३०० हून अधिक विशेष पथकांमार्फत घराघरांत सर्वेक्षण केले जाणार आहे.

या मोहिमेत तापाचे रुग्ण शोधण्याबरोबरच डासांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रनिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यात आशासेविका, एएनएम, बहुउद्देशीय आरोग्य सेवक तसेच कीटक नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एसटी बस नियोजनात उद्यापासून (दि. ११) महत्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर...

जूननंतर रुग्णसंख्येत वाढ:
महापालिकेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, जानेवारीत ६, फेब्रुवारीत ३, मार्चमध्ये १, एप्रिलमध्ये ३, मेमध्ये ८, जूनमध्ये ३३, जुलैमध्ये ४५ आणि सप्टेंबरमध्ये आतापर्यंत १३ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. या मासिक आकडेवारीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ११२ रुग्णांची नोंद झाली आहे.

विभागनिहाय पाहता नवीन नाशिकमध्ये सर्वाधिक ३७ रुग्ण आढळले आहेत. पूर्व विभागात २४, सातपूरमध्ये २०, पंचवटीत १९, पश्चिम विभागात १०, तर नाशिकरोडमध्ये ४ रुग्णांची नोंद झाली आहे.

१.६७ लाखांहून अधिक पाणीसाठ्यांची तपासणी:
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मलेरिया विभागाने ऑगस्टमध्ये १ लाख ६७ हजारांहून अधिक पाणीसाठ्यांची तपासणी केली. अळ्या आढळलेल्या ठिकाणी पाणी रिकामे करण्यासोबतच अबेटिंग, फवारणी तसेच आवश्यक ठिकाणी गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

आगामी विशेष मोहिमेत घर, वसाहती आणि परिसराची तपासणी केली जाणार आहे. तापाचे रुग्ण आढळल्यास आवश्यकतेनुसार त्यांना पुढील तपासणी व उपचारांसाठी रुग्णालयात संदर्भित केले जाणार आहे.

नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन:
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घर आणि परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. कुंड्या, जुने टायर, पाण्याच्या टाक्या, डबे तसेच अन्य वस्तूंमध्ये पाणी साचून राहणार नाही, याची नियमित तपासणी करावी. पाणीसाठे झाकून ठेवावेत आणि साचलेले पाणी तातडीने रिकामे करावे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दत्तक प्रक्रियेला नवी दिशा; ८ बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच ताप, अंगदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास विलंब न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन प्रभारी आरोग्य अधिकारी प्रशांत शेटे यांनी केले आहे.

चिकुनगुनियाचेही ९ रुग्ण:
डेंग्यूसोबतच यंदा शहरात चिकुनगुणियाचे ९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेच्या उपाययोजनांसोबतच नागरिकांनीही घर व परिसरात स्वच्छता राखणे आणि पाणी साचू न देणे आवश्यक आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790