नाशिक: दत्तक प्रक्रियेला नवी दिशा; ८ बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब

नाशिक। दि. १० सप्टेंबर २०२६: बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळावे, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या दत्तक प्रक्रियेला नाशिक जिल्ह्यात महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. केंद्रीय दत्तक प्राधिकरण (CARA), नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासनाने ६ राष्ट्रीय आणि २ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ८ बालकांच्या दत्तक आदेशाची ऑनलाइन प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. यामुळे आठ निरागस बालकांना प्रेमळ पालकांची मायेची सावली आणि सुरक्षित भविष्य मिळाले आहे. आज ही बालके जिल्हाधिकारी कार्यालयात छोटोखानी कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत पालकांकडे सोपविण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंकच्या 'या' भागांतील वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

बालकांच्या पुनर्वसनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल:
बालकांना संस्थात्मक संगोपनाऐवजी शक्य तितक्या सुरक्षित व कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी मिळावी, हा दत्तक प्रक्रियेचा प्रमुख उद्देश आहे. मूल दत्तक घेणे ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून, एका निरागस जीवाला नवे आयुष्य, प्रेम आणि सुरक्षित भविष्य देण्याची मानवीय संधी आहे.

मुलगा असो वा मुलगी, प्रत्येक बालकाला कुटुंबाचे प्रेम, जिव्हाळा आणि आधार मिळणे आवश्यक आहे. या दत्तक प्रक्रियेतून समाजाला हा महत्त्वपूर्ण संदेश मिळत आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे दत्तक प्रक्रियेत पारदर्शकता, कायदेशीरता, सुलभता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी निरीक्षक डॉ. प्रवीण गेडाम आज (दि. १०) जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार SIR चा आढावा

CARA अंतर्गत दत्तक प्रक्रियेचे टप्पे:
केंद्रीय दत्तक-ग्रहण प्राधिकरणाच्या माध्यमातून दत्तक प्रक्रिया कायदेशीर, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येते. इच्छुक पालकांची ऑनलाइन नोंदणी, त्यानंतर होम स्टडी रिपोर्ट, उपलब्ध बालकांची माहिती व प्रोफाईलची निवड, बालकाची प्रत्यक्ष भेट व स्वीकार आणि त्यानंतरची कायदेशीर प्रक्रिया अशा टप्प्यांतून दत्तक प्रक्रिया पूर्ण केली जाते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी किंवा न्यायालयाच्या अधिकृत आदेशाने बालक कायदेशीररीत्या पालकांकडे सोपविले जाते. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या उपस्थितीत ही बालके पालकांकडे सोपविण्यात आली.

शासनाच्या नियमांनुसार प्रक्रिया पूर्ण:
आधार आश्रम संचलित विशेष दत्तक ग्रहण संस्था, नाशिक येथील बालकांच्या संगोपनासंदर्भातील कागदपत्रे व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून संबंधित प्रकरणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आली होती. बालकांच्या सर्वोत्तम हिताला सर्वोच्च प्राधान्य देत शासनाच्या नियम व मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये डेंग्यूचा डंख; १० सप्टेंबरपासून ३०० हून अधिक पथकांची तपासणी मोहीम

या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा सचिन येवले, तसेच आधार आश्रम, नाशिक येथील राहुल जाधव व सुवर्णा जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी दत्तक इच्छुक पालक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790