नाशिककरांची पाण्यासाठी वणवण; पाण्याच्या टँकर- जारच्या दरांवर नियंत्रणच नाही

नाशिक। दि. ६ एप्रिल २०२६: शहरात सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतरही परिस्थिती सुरळीत न झाल्याने नाशिककरांना सोमवारीही पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. विहिरी कोरड्या पडल्याने आणि बोअरवेल निष्प्रभ ठरल्याने नागरिकांची पूर्णतः टँकरवरच निर्भरता वाढली असून, वाढत्या मागणीमुळे टँकरचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

“उद्या पाणी मिळेल”, “टँकरसाठी वेटिंग आहे”, “जार घेऊन जा” अशा प्रतिक्रिया शहरभर ऐकायला मिळाल्या. सुटीचा दिवसही अनेकांनी पाण्याच्या शोधात घालवला. दरम्यान, अपेक्षेपेक्षा कमी गतीने कामे पूर्ण झाल्याने सोमवारी पाणीपुरवठा काही प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एस.टी. बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग झोन'ची प्रभावी अंमलबजावणी

महापालिकेने जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व विविध प्रकल्पांसाठी ४ आणि ५ एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शहराच्या इतिहासात प्रथमच सलग दोन दिवसांचा शटडाऊन लागू करण्यात आला. मात्र, कडक उन्हाळ्यात घेतलेल्या या निर्णयामुळे पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली.

शहरातील अनेक भागांत बोअरवेल उपलब्ध नसल्याने टँकरची मागणी वाढली. परिणामी, साधारण हजार रुपयांचा टँकर तीन हजारांपर्यंत, तर मोठ्या टँकरचे दर पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले. काही ठिकाणी जास्त पैसे देण्याची तयारी दाखवूनही पाणी उपलब्ध न झाल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रविंद्र धारणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांत सुमारे ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. शहरातील विविध भागांत गळती दुरुस्ती, क्रॉस कनेक्शन, तसेच व्हॉल्व बसविण्याची कामे करण्यात आली आहेत. गंगापूर धरण ते बारा बंगला या दरम्यानच्या १८०० मिमी व्यासाच्या पाइपलाईनवरील महत्त्वाचे कामही पूर्ण झाले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

तथापि, गंगापूर हेडवर्क्स, नाशिकरोड आणि गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रांवरील काही महत्त्वाची कामे अद्याप सुरू असून ती पहाटेपर्यंत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. ही कामे पूर्ण झाल्यानंतरच काही भागांत पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू होईल.

दरम्यान, शिवाजीनगर आणि मुकणे जलशुद्धीकरण केंद्रांतून रविवारी सायंकाळपासून सुमारे ३०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, त्या भागांत पुरवठा सुरळीत असल्याचे सांगण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना जारवरही अवलंबून राहावे लागले. नेहमी ४० ते ५० जार विकले जाणाऱ्या ठिकाणी दोन दिवसांत ३५० हून अधिक जारची विक्री झाली. साधारण ६० रुपयांना मिळणारा जार २०० रुपयांपर्यंत विकला गेला. काही विक्रेत्यांनी दर वाढवल्याने नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागले.

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. त्यातच शटडाऊननंतरही पुरवठा सुरू न झाल्याने तिसऱ्या दिवशीही पाण्यासाठी प्रतीक्षा कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790