नाशिक | दि. ४ जुलै २०२५: त्र्यंबकेश्वर परिसरासह घाटमाथ्यावर सुरू असलेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीपात्रात विसर्ग पुन्हा वाढविण्यात आला आहे. गुरुवारी (३ जुलै) दुपारपासून गंगापूर धरणातून नदीत सोडण्यात येणारा विसर्ग वाढवून ३,७१६ क्युसेक इतका करण्यात आला आहे, त्यामुळे शहरातील गोदावरी नदीची पाणीपातळीही वाढू लागली आहे.
शहरात पावसाचा जोर तुलनेत कमी असला तरी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र समाधानकारक पर्जन्यमान नोंदवले गेले आहे. गेल्या २४ तासांमध्ये अंबोली येथे ३७ मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये २४ मिमी, कश्यपीमध्ये २० मिमी आणि गौतमी परिसरात १६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या वाढीव पावसामुळे गंगापूर धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे.
सध्या गंगापूर धरणाचा जलसाठा ६०.९१ टक्क्यांवर पोहोचला असून, जलसाठ्यातील वाढ लक्षात घेता जलसंपदा विभागाने गोदावरी नदीत विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून हा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे होळकर पुलाखालील गोदावरी नदीतून दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ४,८८१ क्युसेक पाणी रामकुंडापर्यंत प्रवाहित होत होते.