
नाशिक। ४ जुलै २०२५: पैशांच्या हव्यासापोटी ट्रकचालकाची हत्या करून मृतदेह चामर लेणीजवळ फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी ट्रकचालकाकडील ATM कार्ड मिळवल्यानंतर पिन कोड चुकीचा दिला गेल्याने संतप्त होऊन त्याला पाण्याच्या डबक्यात बुडवून ठार केल्याची कबुली दिली आहे. या थरारक हत्याकांडात सहभागी असलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
२२ जून २०२५ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास चामर लेणी बोरगड, पेठ रोडच्या पायथ्याशी एका कच्च्या रस्त्यावर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलीस हवालदार प्रभाकर रंगनाथ सोनवणे यांनी यासंदर्भात म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषण करत मृत इसमाचे नाव उमेश नागप्पा आंबिगार (वय ३४, रा. मरकुंडा, ता. जि. बिदर, कर्नाटक) असल्याचे निष्पन्न झाले.
गुन्ह्याच्या तपासासाठी आणि आरोपींच्या शोधार्थ गुन्हे शाखा युनिट १ ने पाच पथके तयार केली होती. तपासादरम्यान काही संशयित वाहने पोलिसांच्या रडारवर आली. त्यावरून पोलिसांनी सखोल तपास केला आणि एक संशयित मोटारसायकल निष्पन्न झाली. त्या आधारे चौघा आरोपींची नावे उघडकीस आली. तांत्रिक तपासासोबतच गुप्त बातमीदारांचाही आधार घेत म्हसरूळ आणि बोरगड परिसरात शोधमोहीम राबवून पोलिसांनी संशयित विजय मधुकर खराटे (वय २०, रा. वडनगर, म्हसरूळ), संतोष सुरेश गुंबाडे (वय २६, रा. कोळीवाडा, म्हसरूळ), अविनाश नामनाथ कापसे (वय २०, रा. मखमलाबाद, नाशिक) आणि रवि सोमनाथ शेवरे (वय २८, रा. मानोरी, दिंडोरी) या चौघांना सापळा रचून अटक केली.
पोलिसांनी चौकशीत आरोपींना विश्वासात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची थरारक कबुली दिली. रवि शेवरेने ट्रकचालक उमेश आंबिगार याची रेकी करत ट्रकमध्ये मोठी रक्कम आणि मोबाईल मिळण्याची माहिती दिली होती. त्यानंतर चौघांनी मिळून ट्रकजवळ जाऊन सिगारेट मागण्याच्या बहाण्याने चालकाला बाहेर बोलावले. दरवाजा उघडताच ते जबरदस्तीने कॅबिनमध्ये घुसले आणि त्याच्याकडे पैसे मागितले.
उमेशने नकार दिल्यानंतर संतोष गुंबाडे याने त्याच्या डोक्यात टोकदार दगडाने मारले आणि इतरांनीही त्याच्यावर अमानुष मारहाण केली. त्याच्याकडील दोन ATM कार्ड जबरदस्तीने घेतली आणि पिन विचारला. पिन कोड चुकीचा दिल्याने ATM मधून पैसे निघाले नाहीत. त्याचा राग मनात धरून चौघांनी उमेशला मोटारसायकलवर बसवून तीन वेगवेगळ्या ATM केंद्रांवर घेऊन गेले. मात्र पैसे न निघाल्याने त्यांनी उमेशला पुन्हा मारहाण केली आणि शेवटी चामर लेणीच्या पायथ्याशी पाण्याच्या डबक्यात नाक व तोंड बुडवून, गळा दाबून ठार मारल्याचे त्यांनी कबूल केले. या दरम्यान रवि शेवरे हा सतत परिसरावर लक्ष ठेवत होता, कोणी पाहत तर नाही ना याची टेहाळणी करत होता.
चौघांवर खून, जबरी चोरी, कट कारस्थान यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास म्हसरूळ पोलीस करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, महिला सहायक पोलीस निरीक्षक जया तारडे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, श्रेणी उप निरीक्षक किरण शिरसाठ, पोलीस हवालदार प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, प्रशांत मरकड, विशाल काठे, योगीराज गायकवाड, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, महेश साळुंके, रोहिदास लिलके, उत्तम पवार, रमेश कोळी, रविंद्र आढाव, देविदास ठाकरे, धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, आप्पा पानवळ, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, गोरक्ष साबळे, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, शर्मिला कोकणी, अनुजा येलवे, मनिषा सरोदे, सुकाम पवार, समाधान पवार यांच्या पथकाने केली.