
नाशिक। दि. १ मार्च २०२६: चौथे विश्व मराठी संमेलन दोन दिवसांपासून कुसुमाग्रज नगरीत सुरू आहे. या विश्व मराठी संमेलनातील स्व. बाबुराव बागुल दालनात खाजगी प्रकाशकांचे 150 पेक्षा अधिक पुस्तक स्टाॅल आणि शासकीय विभागांची माहितीपर 33 दालने उभारण्यात आली आहेत. या स्टाॅलला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पहिल्या दोन दिवसांतच लाखोंची उलाढाल झाली आहे. विशेषतः चरित्रग्रंथ आणि कथासंग्रहांना वाचकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली आहे.
राज्याच्या मराठी भाषा विभागाच्यावतीने आयोजित या संमेलनात साहित्यप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. प्रथमच विविध शासकीय विभागांनी उभारलेल्या दालनांमधून शासनाच्या योजनांचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येत आहे.
या संमेलनात उभारण्यात आलेल्या विविध दालनांमध्ये ऐतिहासिक वारसा स्थळे, सांस्कृतिक कार्य विभागाचे पुरालेखागार, दिव्यांग सक्षमीकरण, मुद्रण-प्रकाशन उद्योग, ग्रंथालय विश्व, संवाद माध्यमे (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय), बार्टी, आर्टी, सारथी, महाज्योती, अमृत, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, दादासाहेब फाळके चित्रनगरी, महासंस्कृती, हिरकणी दालन (महिला व बालविकास विभाग), खाद्यसंस्कृती, हस्तकला, बोलीभाषा पर्यटन, बृहन्महाराष्ट्र मंडळ, आंतरराष्ट्रीय मंच, साहित्यिकांचे स्वाक्षरी दालन, कृषी व पशुसंवर्धन, मृद व जलसंधारण, औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, वस्त्रोद्योग-हातमाग, तंत्रशिक्षण व मराठी भाषा, रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठ, आदिवासी विकास विभाग आदींचा समावेश आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘लोकराज्य’ मासिकाचे जुने, दुर्मिळ अंक येथे वाचकांना पाहायला मिळत आहे. तसेच संमेलनातच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेल्या आपलं मंत्रालय चा मराठी भाषा विशेषांक वाचकांसाठी उपलब्ध आहेत.
‘शबरी – एक आदि चळवळ’ या दालनामध्ये आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या प्रीमियम उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. तसेच आदिवासी बांधवांच्या विविध योजनांची माहितीही या दालनात देण्यात आली आहे.
जगभरातून मराठीप्रेमींची उपस्थिती:
संमेलनाला देश-विदेशातून आलेल्या मराठीप्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असून मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
![]()

