चौथे विश्व मराठी संमेलन: कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून मराठी भाषेत ज्ञान, सेवा व विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार- संतोष साळवी

नाशिक। दि.१ मार्च २०२६: माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जग जवळ आले आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात आपल्याला सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. आता कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून मराठी भाषेत ज्ञान, सेवा व विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन अमेरिकेतील राज्य प्रतिनिधी, आमदार संतोष साळवी यांनी आज आयोजित कार्यक्रमात केले.

येथील रावसाहेब थोरात सभागृहात कृत्रिम बुद्धिमत्ता व मराठीतील वापर या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिक विभागाचे निवृत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, सचिन जोशी, सुनील खांडबहाले, वैभव शेळके, योगेश शुक्ल, मराठी भाषा विभागाच्या पर्यवेक्षक वैशाली वाघमारे, कक्ष अधिकारी विशाखा दातार यांच्यासह नागरिक व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार श्री. साळवे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अद्ययावत आणि विकसित आवृत्तीमुळे माहिती तंत्रज्ञानाच्या कक्षा मोठ्या प्रमाणात रुंदावल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेत माहितीचे स्वयंचलन, भाषा कौशल्य, अचूकता असे अनेक फायदे आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रामध्ये एक संधी म्हणून प्रभाव पडला आहे. एआय तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे जीवन सुकर व सुलभ झाले आहे. मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी इतर भाषांना सामावून घेवून त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. एआयची भीती न बाळगता त्याचा प्रभावीपणे व अचुक वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञ प्राध्यापकांची भरती

डॉ. शेखर म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या जगात भाषेचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि ती अधिक समृद्ध व संपन्न करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच सायबर सुरक्षा सक्षम करण्यासाठी एआयची जोड देण्यात येत आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांवर वेळीच आळा घालणे सोईस्कर होणार आहे. कोणत्याही क्षेत्रात एआयचा वापर करतांना उच्चार स्पष्ट व अचुक वापरावेत. एआय हे प्रत्येक क्षेत्राला आव्हान असून त्याकडे आव्हान म्हणून न पाहता संधी म्हणून वापर करावा. प्रत्येकाने एआयचा आपआपल्या क्षेत्रात प्रभावी वापर करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते

सचिन जोशी म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान काळानुरुप अद्ययावत होत असून त्याचे अद्ययावत विविध टुलचे ज्ञान व माहिती सर्वांना आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भावनेची जोड दिल्यास तंत्रज्ञान वापरणे अधिक सुलभ होणार आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर तळगाळापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यावेळी श्री. जोशी यांनी एआय वापरबाबत विविध उदाहरणे देवून प्रात्याक्षिकद्वारे उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

श्री. खांडबहाले म्हणाले की, एआयचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यासाठी विविध टुल्सचा वापर करुन आपण विकसित होणे आवश्यक आहे. मराठी भाषेमध्ये एआयचा वापर करावयाचा असेल, तर डिजिटल डाटा आवश्यक आहे. त्यासाठी भावनिक बुध्दीमत्ता एआयमध्ये आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच उद्योजकांनी एकत्र येवून त्यांनी एआयचा प्रभावी वापर करावा. संगणक व एआयमध्ये खूप फरक आहे. एआय म्हणजे एक मशिन आहे. ती माणसासारखे विचार करते. त्यामुळे प्रत्येकाने एआय शिकण्यासाठी स्वत:ला त्याप्रमाणे विकसित करणे आवश्यक असून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन वापर करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एस.टी. बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग झोन'ची प्रभावी अंमलबजावणी

वैभव शेळके म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवाचे जीवन सुकर होणार असून कोणतेही काम गतीने व अचूक होण्यासाठी मदत होणार आहे. एआय हे आपल्यासाठी मार्गदर्शकाचे काम करत आहे. मराठी ज्ञानप्रणाली अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे मराठीचा वापर एआयमध्ये सुकर होणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. योगेश शुक्ल यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी एआय बाबत उपस्थितांनी विचारलेल्या शंका व समस्याबाबत उत्तरे देवून संवाद साधला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790