नाशिक (प्रतिनिधी): व्याजाने घेतलेल्या १५ लाख रुपयांच्या बदल्यात ३८ लाखांची रक्कम फेडूनही संशयित सावकाराने ५० लाखांची मागणी केली. तसेच पिस्तूल दाखवून रक्कम दिली नाही, तर तक्रारदार महिला आणि पतीस ठार करण्याची तसेच अल्पवयीन मुला-मुलीस उचलून नेण्याची धमकी दिल्याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
भद्रकाली पोलिसांनी संशयित रोहित कुंडलवाल यास अटक केली आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीप्रमाणे: पीडित महिला आणि तिच्या पतीने व्यवसायासाठी वेळोवेळी सुमारे १५ लाख रुपयांचे कर्ज संशयित कैलास कुंडलवाल आणि रोहित कुंडलवाल यांच्याकडून घेतले. त्या बदल्यात पीडितांनी ३८ लाखांची रक्कम संशयितांना परत केली. त्या व्यतिरिक्त पीडितांकडे ५० लाख रुपयांची रक्कम येणे बाकी असल्याचे सांगत संशयितांनी रकमेसाठी तगादा लावला.
दरम्यान, रविवारी (ता. ९) संशयित रोहितने पीडितांना भेटण्यासाठी बोलावले. पती आजारी असल्याने पीडित महिला एकटी त्यास भेटण्यासाठी गेली. त्याने जबरदस्तीने महिलेस त्याच्या चारचाकीत बसवून गंगापूर रोडवरील एका हॉटेलजवळ नेले. त्याठिकाणी तिला अर्वाच्च भाषेत लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे शिवीगाळ केली. त्याच्याकडील पिस्तूल दाखवून रक्कम दिली नाही, तर ठार करण्यासह त्यांच्या अल्पवयीन मुलांना उचलून नेण्याची धमकी दिली.
रक्कम देण्याचे आश्वासन दिल्यावर त्याने महिलेस सोडले. सोमवारी (ता. १०) पुन्हा त्याने पंचवटी येथील भक्तिधाम सिग्नलजवळ भेटण्यास बोलावले. पीडित महिला आणि तिचे पती दोघेही त्याठिकाणी गेले. संशयित रोहित चारचाकीत बसलेला होता. काही गुंड चारचाकीभोवताली उभे होते. त्याने महिलेच्या पतीस चारचाकीत बसवून त्यांनाही पिस्तूल दाखवून व मुलांना उचलून नेण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडितांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले. बुधवारी (ता. १२) दुपारी संशयित रोहित कुंडलवाल पीडितांच्या कपड्याच्या दुकानावर गेला.
रक्कम परत करण्याची मागणी करीत महिलेच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केले. सततचा त्रास असह्य झाल्याने पीडित महिलेच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात बेकायदेशीर सावकारी आणि बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक चौकशी सुरू आहे.