नाशिक: सहा लाखांच्या आठ दुचाकी जप्त; दोघे चोर जाळ्यात, सात गुन्ह्यांची उकल

नाशिक। दि. २६ फेब्रुवारी २०२६: शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट-२ने मोठी कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून सुमारे पाच लाख ४० हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे विविध पोलिस ठाण्यांतील सात गुन्ह्यांची उकल झाली आहे.

शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सरकारवाडा, सातपूर, गंगापूर, अंबड, उपनगर, इंदिरानगर, नाशिकरोड, पंचवटी आणि मुंबई नाका या परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार दुचाकी चोरी रोखण्यासाठी संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी सर्व पथकांना दिल्या होत्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

गुन्हे शाखा युनिट-२चे पथक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असताना संशयितांची हालचाल आढळून आली. तांत्रिक विश्लेषणासोबतच गोपनीय माहितीच्या आधारे श्रेणी उपनिरीक्षक मुख्तारखान पठाण आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांनी संशयितांचा माग काढला. प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पिंपळगाव खांब परिसरात सापळा रचला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

तेथे गौरव शिवानंद प्रसाद (वय १९, रा. पंचवटी) हा त्याच्या एका अल्पवयीन साथीदारासह येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून बुलेट (एमएच १८ सीए ०७३९) आणि मोपेड (एमएच १५ एफपी ४८५६) या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. चौकशीत या दुचाकी चोरीच्या असल्याची कबुली संशयिताने दिली.

पुढील तपासात नाशिक शहरातील विविध भागांसह सिन्नर येथूनही दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले. एकूण आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून गंगापूर पोलिस ठाण्यातील पाच, तसेच सरकारवाडा आणि सिन्नर पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा सात गुन्ह्यांची उकल झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

आरोपीस पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अल्पवयीन साथीदाराबाबत स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी दुचाकी सुरक्षित ठिकाणी उभी करावी व अँटी-थेफ्ट साधनांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790