Amazon

नाशिक: फसवणूकप्रकरणी भोंदू अशोक खरातला पुन्हा चार दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक। दि. ३ ऑक्टोबर २०२६: व्यापारवृद्धीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपातील भोंदू अशोक खरात याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने पुन्हा चार दिवसांची वाढ केली आहे. शुक्रवारी (दि. २) त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

नेवासा येथील कापड व्यावसायिकाची सोन्याचे दागिने आणि सुमारे अडीच लाख रुपयांची रोकड घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी खरातला ताब्यात घेतले होते. त्याची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपत असल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘सारथी’तर्फे लक्षित गटाच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने तपासासाठी आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक असल्याची मागणी केली. मात्र, बचाव पक्षाने प्रकरणाचा आवश्यक तपास पूर्ण झाल्याचा दावा करत पुन्हा पोलिस कोठडी देण्यास विरोध केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने खरातला आणखी चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढला; कमाल तापमान ३४.८ अंशांवर

नेवासा येथील कापड व्यावसायिक राजेंद्र भागवत यांना व्यापारात मोठी वाढ होण्याचे आमिष दाखवून खरातने सोन्याच्या अंगठ्या तसेच सुमारे अडीच लाख रुपयांची रोकड घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने भागवत यांना ‘सिद्ध खडा’ असल्याचे सांगत एक अंगठी दिली होती. मात्र, तपासणीदरम्यान ती अंगठी धातूची असल्याचे समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे भागवत यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑक्टोबर हीटचा तडाखा सुरूच; नाशिकचे कमाल तापमान ३५ अंशांवर !

या तक्रारीवरून पोलिसांनी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सरकारवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. ३० सप्टेंबर) खरातला ताब्यात घेतले होते.

दरम्यान, अशोक खरातविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक आणि अत्याचाराशी संबंधित एकूण दहा गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. इतर गुन्ह्यांमध्ये तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790