नाशिक। दि. २० जून २०२६: यंदाच्या पावसावर ‘एल निनो’चा प्रभाव दिसून येत आहे. जूनमध्ये जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत १०.९ मिलिमीटर एवढे आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची माहिती द्यावी. अपुऱ्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक भिवा लवटे यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुरेसा पाऊस झाल्यावर करावी पेरणी:
या बैठकीत मॉन्सूनची सद्य:स्थिती, एल निनो हवामान घटकाचा संभाव्य प्रभाव आणि खरीप हंगामावार त्याचा होणारा परिणाम याविषयी आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, पावसाची अचूक आकडेवारी प्राप्त होण्यासाठी सर्व हवामान केंद्रांची तपासणी करावी. किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस होत नाही आणि जमिनीत पेरणीयोग्य ओल निर्माण होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी पूर्णपणे टाळावी.
पावसाचा संभाव्य खंड लक्षात घेता संपूर्ण क्षेत्रात एकाच वेळी पेरणी न करता ती टप्प्या- टप्प्याने करावी. त्यामुळे आर्थिक जोखीम कमी होईल. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांनी घरचेच प्रमाणित बियाणे (विशेषतः सोयाबीनचे) राखीव ठेवावे.
मिश्र पिकांना द्यावे प्राधान्य:
यंदा कमी पावसाच्या अंदाजामुळे ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद आणि तीळ यांसारख्या पारंपरिक व कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. पिकांच्या जोखीम व्यवस्थापनासाठी तूर + सोयाबीन, बाजरी + तूर किंवा कापूस + मूग यासारख्या मिश्र पिकांची पद्धत अवलंबिण्यास सांगावी. बदलत्या हवामानात सुरक्षित उत्पादनासाठी कृषी विभागाने मिश्र पीक पद्धती + कमी कालावधीचे वाण + पाणी साठवण + हवामानानुसार निर्णय = सुरक्षित उत्पादन हे यशाचे सूत्र मांडले आहे. पेरणीसाठी गादीवाफा (Broad Bed Furrow – BBF) पद्धतीच्या वापराविषयी जनजागृती करावी. जिल्ह्यातील एकूण १६०५ गावांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रसार करावा. यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा निचरा सुलभ होतो.
महाविस्तार एआय ॲपचा वापर करावा:
जमिनीतील बाष्पीभवन रोखण्यासाठी पीक अवशेषांचे मल्चिंग (Mulching) करावे. ठिबक व तुषार सिंचनाचा काटेकोर वापर करून शेततळ्यांमध्ये ‘संरक्षित सिंचन साठा’ राखून ठेवावा. कृषी विभागाच्या अधिकृत महाविस्तार एआय ॲपचा वापर करून शेतकऱ्यांनी हवामान अंदाज आणि आपल्या शंकांचे डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून निरसन करून घ्यावे. नाशिक जिल्हा फलोत्पादनात अग्रेसर जिल्हा असल्याने टंचाईच्या परिस्थितीत फळबागा वाचवण्यासाठी विशेष मोहीम राबवीत कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे.
ॲग्रीस्टॅकची नोंदणी करावी:
खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत जिल्ह्यात एकूण ४,७५,६२२ अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये ३०,४८१ शेतकऱ्यांना ८७८.४६ लाख रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे. उर्वरित तांत्रिक अडचणी व स्वयंचलित हवामान केंद्रांच्या (AWS) दुरुस्तीबाबत स्कायमेट (Skymet) व विमा कंपन्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यत ६,५५,८७९ (८४ टक्के) शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी झाली असून उर्वरित खातेदारांची नोंदणी जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांचे ई-केवायसी (e-KYC), लाभार्थ्यांचे आधार सीडिंगची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. यावेळी एकात्मिक फलोत्पादन अभियान, पीक विमा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजनेची महाडीबीटीवरील प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिल्या.
खते, बियाण्यांचा पुरेसा साठा:
जिल्ह्यात खते आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या युरियाचा ४२,००८ टन आणि डीएपी (DAP) चा १३,३९८ टन साठा उपलब्ध असून वितरण प्रक्रिया सुरळीत सुरू आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने यांनी दिली. ‘आत्मा’ चे प्रकल्प संचालक श्री. काशिद यांनी आभार मानले.
![]()


