Amazon

महाराष्ट्रात सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध; भेसळखोरांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई। दि. १६ ऑक्टोबर २०२६: राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त मसाले उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मसाला उद्योगासाठी कठोर अनुपालन निर्देश जारी केल्याची घोषणा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत केली. मसाल्यांमधील भेसळ, प्रतिबंधित रंगांचा वापर आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मसाल्यांच्या उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे निकष पाळले जात आहेत की नाही, यावर प्रशासन लक्ष ठेवणार आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ आणि त्याअंतर्गत लागू नियमांचे पालन करणे सर्व संबंधित अन्न व्यावसायिकांना बंधनकारक राहणार आहे.

मसाल्यांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई:
मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग, निकृष्ट दर्जाचा कच्चा माल, अर्क काढून घेतलेले मसाले किंवा अन्य अनधिकृत पदार्थ मिसळल्याने ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी उत्पादक, प्रक्रिया करणारे व्यावसायिक, पुरवठादार आणि विक्रेते यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

हळद, मिरची, धणे, जिरे, काळी मिरी, दालचिनी, लवंग, वेलदोडे, हिंग, केशर, खसखस, गरम मसाला, करी पावडर आणि मिश्र मसाल्यांसह विविध उत्पादनांना हे निर्देश लागू होतील. मसाले स्वच्छ करणे, वाळविणे, दळणे, मिश्रण करणे, पॅकिंग, पुनर्पॅकिंग, साठवण, वाहतूक आणि विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचाही त्यात समावेश आहे. हॉटेल्स, उपाहारगृहे, केटरर्स आणि संस्थात्मक स्वयंपाकगृहांनाही लागू असलेल्या तरतुदींचे पालन करावे लागेल.

🔎 हे वाचलं का?:  शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये जमा करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिबंधित रंग आणि अनधिकृत पदार्थ वापरल्यास कारवाई:
मसाल्यांना आकर्षक रंग देण्यासाठी किंवा त्यांचे वजन वाढविण्यासाठी हानिकारक पदार्थ वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मेटॅनिल यलो, रोडामाइन बी, सुदान डाईज आणि लेड क्रोमेट यांसारख्या प्रतिबंधित रंगांचा वापर करण्यास मनाई आहे.

तसेच विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा, अनधिकृत स्टार्च आणि अन्य परकीय पदार्थ मिसळणे, निकृष्ट दर्जाच्या मसाल्यांचे मिश्रण करणे किंवा अर्क काढून घेतलेल्या मसाल्यांची विक्री करणे यांनाही आळा घालण्यात येणार आहे.

अस्वच्छ ठिकाणी मसाले वाळविण्यास मनाई:
मसाले वाळविण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित जागेचा वापर करणे आवश्यक आहे. सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारे, कचराकुंड्यांजवळ किंवा जनावरांच्या गोठ्यांच्या परिसरात मसाले वाळवता येणार नाहीत.

उत्पादन आणि साठवणुकीच्या ठिकाणी स्वच्छता राखणे, परिसर कोरडा व कीडमुक्त ठेवणे आणि मसाल्यांचे दूषित घटकांपासून संरक्षण करणे बंधनकारक असेल. मसाल्यांसोबत रसायने, कीटकनाशके, औद्योगिक रंग किंवा अन्य हानिकारक पदार्थ साठविण्यासही मनाई आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक व विक्रीवर बंदी; दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

वैध अन्न परवाना आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आवश्यक:
मसाला व्यवसायाच्या स्वरूपानुसार प्रत्येक व्यावसायिकाकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (FSSAI) वैध परवाना किंवा नोंदणी असणे आवश्यक आहे. केवळ व्यापारी परवाना असल्याने मसाल्यांचे उत्पादन किंवा दळण करण्याची परवानगी मिळणार नाही.

अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, वैद्यकीय तंदुरुस्ती आणि आवश्यक प्रशिक्षण यांची खात्री करावी लागेल. त्याचबरोबर अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी करणेही बंधनकारक राहील.

पॅकिंगवरील माहिती अचूक असणे गरजेचे:
ग्राहकांना मसाल्यांच्या गुणवत्तेबाबत आणि घटकांबाबत योग्य माहिती मिळावी, यासाठी पॅकेटवर उत्पादनाचे नाव, घटक पदार्थ, उत्पादकाचा तपशील, FSSAI परवाना क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादन किंवा पॅकिंग दिनांक आणि अंतिम वापराची मुदत अथवा ‘बेस्ट बिफोर’ यांसारखी आवश्यक माहिती नमूद करावी लागेल.

उत्पादन शुद्ध, नैसर्गिक किंवा सेंद्रिय असल्याचे तसेच आरोग्यविषयक फायदे असल्याचे दिशाभूल करणारे किंवा पुराव्याशिवाय दावे करता येणार नाहीत.

सुट्या मसाला पावडरच्या विक्रीवर निर्बंध:
मसाल्यांची गुणवत्ता टिकवून ठेवणे, भेसळ आणि दूषितीकरण रोखणे तसेच उत्पादनाचा मागोवा घेणे शक्य व्हावे, यासाठी सुट्या आणि विनापॅकिंग स्वरूपातील मसाला पावडर व मिश्र मसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधित नियमांनुसार मसाल्यांचे योग्य पद्धतीने पॅकिंग आणि सीलिंग करूनच त्यांचे वितरण व विक्री करावी लागेल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एमडी ड्रग्जप्रकरणी तिघे जाळ्यात; 2.87 लाखांचे ड्रग्ज जप्त

इथिलीन ऑक्साइडचा वापर करण्यास मनाई:
मसाल्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी इथिलीन ऑक्साइड या रसायनाचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी कायद्यानुसार मान्य असलेल्या प्रक्रियांचाच वापर करणे आवश्यक असेल.

याशिवाय मसाल्यांमधील कीटकनाशकांचे अवशेष, अफ्लाटॉक्सिन, जड धातू आणि अन्य दूषित घटकांची लागू मानकांनुसार तपासणी केली जाणार आहे.

भेसळीचा मूळ स्रोत शोधणार:
भेसळयुक्त मसाले आढळल्यास कारवाई केवळ किरकोळ विक्रेत्यापुरती मर्यादित ठेवली जाणार नाही. संबंधित उत्पादनाचा मूळ उत्पादक, मसाले दळणारे व मिश्रण करणारे व्यावसायिक, पुनर्पॅकिंग करणारे, पुरवठादार आणि प्रतिबंधित रंग किंवा भेसळीसाठी लागणारे पदार्थ उपलब्ध करून देणाऱ्यांचाही शोध घेतला जाणार आहे.

अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांना कायद्यानुसार जबाबदार धरले जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. संपूर्ण पुरवठा साखळीची तपासणी करून दोषींविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यावर भर दिला जाणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790