Amazon

नाशिक: एमडी ड्रग्जप्रकरणी तिघे जाळ्यात; 2.87 लाखांचे ड्रग्ज जप्त

नाशिक, दि. १६ ऑक्टोबर २०२६: शहरात विक्रीच्या उद्देशाने मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या पथकाने तिघांविरुद्ध कारवाई केली आहे. या प्रकरणात ९५.७०० ग्रॅम एमडीसदृश पदार्थासह दुचाकी आणि तीन मोबाइल फोन असा एकूण ४ लाख ६७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे.

चोपडा लॉन्स होम परिसरातून रामवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुपारी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेल्या एमडीसदृश पदार्थाची किंमत २ लाख ८७ हजार १०० रुपये असल्याचे नोंदवण्यात आले आहे. याशिवाय सुमारे दीड लाख रुपये किमतीची दुचाकी आणि तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रात सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध; भेसळखोरांवर कठोर कारवाईचा इशारा

तिघांविरोधात गुन्हा दाखल:
या प्रकरणी भूषण रंगनाथ भडांगे (वय २७, रा. कृष्णनगर, पंचवटी), राहुल संजय हिंगमिरे (वय २७, रा. जोशीवाडा) आणि जगदीश सोमनाथ चोथे (वय १९, रा. दत्तनगर, पेठरोड, पंचवटी) यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय शिंदे आणि बाळा अशी नावे समोर आलेल्या अन्य दोन संशयितांचा या प्रकरणात उल्लेख आहे. त्यांची पूर्ण नावे आणि पत्ते अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कोयत्याने हल्ला करुन जबरी चोरी; तीन आरोपी जेरबंद

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई:
अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे पोलिस उपनिरीक्षक गणेश भास्कर देवरे यांच्या फिर्यादीनुसार, काही व्यक्ती विक्रीसाठी एमडीसदृश पदार्थ बाळगून असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी कारवाई केली.

या वेळी संशयितांकडून पांढऱ्या व पिवळसर रंगाचा आणि उग्र वास असलेला मेफेड्रोनसदृश पदार्थ जप्त करण्यात आला. त्याची किंमत प्रतिग्रॅम तीन हजार रुपये या दराने २ लाख ८७ हजार १०० रुपये नमूद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शैक्षणिक योजनांच्या लाभासाठी ऑफलाईन प्रवेश अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यत मुदतवाढ

तीन मोबाइल फोन आणि दुचाकी जप्त:
कारवाईदरम्यान जांभळ्या रंगाचा ओप्पो, फिकट गुलाबी रंगाचा सॅमसंग आणि आयफोन असे तीन मोबाइल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याशिवाय दीड लाख रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.

या प्रकरणात जप्त केलेला पदार्थ मेफेड्रोन असल्याची अधिकृत पुष्टी आणि पुढील तपासातील निष्कर्ष याबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790