३० जूनपर्यंतच संधी! HSRP नंबर प्लेट अनिवार्य; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

मुंबई/नाशिक | दि. २९ जून २०२६: राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून, त्यानंतर १ जुलैपासून HSRP नसलेल्या वाहनांवर पोलीस आणि परिवहन विभागाकडून मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय अशा वाहनधारकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अनेक महत्त्वाच्या सेवांपासूनही वंचित राहावे लागणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची १५ सप्टेंबर रोजी त्रैमासिक बैठक

परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, HSRP नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांसाठी वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा नोंद किंवा रद्द करणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील तांत्रिक बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओच्या सेवांवर निर्बंध राहतील. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू करण्यात आलेली नाही.

दरम्यान, ३० जूनपर्यंत HSRP बसविण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता १ सप्टेंबरला; तारखेत बदल

राज्यात HSRP बसविण्याच्या कामासाठी तीन स्वतंत्र झोन निश्चित करण्यात आले आहेत. झोन १ मध्ये रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, झोन २ मध्ये रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि झोन ३ मध्ये एफटीए HSRP सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाने HSRP बसविण्याचे अधिकृत दरही निश्चित केले आहेत. त्यानुसार दुचाकीसाठी ४५० रुपये, तीनचाकीसाठी ५०० रुपये, तर हलकी मोटार वाहने तसेच मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनांसाठी ७४५ रुपये (जीएसटी वगळून, फिटमेंट शुल्कासह) आकारण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थासाठी साधुग्राम, मंडप व्यवस्थेचा आढावा; २०१५च्या कुंभमेळ्यातील अनुभवाचा नियोजनात उपयोग

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ अंतर्गत पोलीस आणि परिवहन विभाग संयुक्त किंवा स्वतंत्रपणे कारवाई करणार आहेत. तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनीही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790