आत्तापर्यंत ४१ ग्राहकांनी गंगापूर पोलिसात अर्ज केले आहेत.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आरबीएल बजाज क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या नावाखाली त्या कार्डचा वापर करून ४१ तक्रारदारांना ३३ लाख ३५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
संशयित कमलेश मनसुब खटकाळे (रा. सातपूर-अंबड लिंकरोड, चुंचाळे शिवार) पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, फसवणूक झालेल्या ग्राहकांना वसुलीसाठी येणाऱ्यांना सामोरे जावे लागते आहे.
रितेश शांतीलाल शजपाल (रा. पाटील कॉलनी, कॉलेजरोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्याकडे आरबीएल बजाज फायनान्स कंपनीचे क्रेडिट कार्ड होते. ते कार्ड त्यांना बंद करायचे होते.
त्यासाठी त्यांनी कंपनीकडे संपर्क साधला असता, कंपनीचा कर्मचारी असलेला संशयित कमलेश खटकाळे याने ते क्रेडिट कार्ट बंद करतो असे सांगत नेले. मात्र त्याने त्यांचे क्रेडिट कार्ड बंद न करता १ लाख १४ हजार रुपये स्वत:साठी वापरत रितेश यांची फसवणूक केली.
अशाचरितीने संशयित कमलेश याने ४१ ग्राहकांचे क्रेडिट कार्ड बंद करतो म्हणून घेतले. मात्र त्याने ते बंद न करता त्याचा स्वत:साठी वापर केला आणि ३३ लाख ३५ हजार २८८ रुपयांची फसवणूक केली आहे. क्रेडिट कार्डधारकांना बजाजकडून थकीत वसुलीसाठी तगादा सुरू झाल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
अनेकांनी बँकेकडे तक्रारी केल्या. त्यानंतर गंगापूर पोलिसात तक्रारी दिल्या आहेत. आत्तापर्यंत ४१ ग्राहकांनी गंगापूर पोलिसात अर्ज केले आहे. सदरचा प्रकार ऑक्टोबर २०२३ ते डिसेंबर २०२३ या दरम्यान झाला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाणे हे तपास करीत आहेत.