नाशिकमध्ये आता सिग्नल तोडल्यास थेट ई-चलनद्वारे दंड; ‘या’ ४० सिग्नलवरील सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित

नाशिक। दि. २० फेब्रुवारी २०२६: शहरातील प्रमुख ४० वाहतूक सिग्नलवरील सीसीटीव्ही यंत्रणा आजपासून कार्यान्वित करण्यात आली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता थेट ई-चलनाद्वारे कारवाई होणार आहे. नियमभंगाची नोंद सीसीटीव्हीत कैद होताच संबंधित वाहनधारकाच्या मोबाईलवर दंडाचा संदेश पाठविण्यात येणार आहे.

सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, बेकायदेशीर यूटर्न घेणे, ट्रिपल सीट प्रवास करणे आदी प्रकारांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे शहरातील वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक ठरणार आहे. अन्यथा सीसीटीव्हीच्या ‘तिसऱ्या डोळ्या’तून सुटका होणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात सीसीटीव्ही बसविण्यात आले होते; मात्र ते अद्याप कार्यान्वित झाले नव्हते. पोलीस आयुक्तालयाने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आणि दृश्यमानतेच्या तक्रारी दूर करून उच्च दर्जाचे नवीन कॅमेरे बसविण्यात आले. नव्याने बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची जोडणी पोलीस नियंत्रण कक्षाशी करण्यात आली असून, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा अधिक प्रभावी ठरणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुढील ३ ते ५ दिवसांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता

पोलीस नियंत्रण कक्षात ६ बाय ४ फूटांची एलसीडी वॉल उभारण्यात आली असून, १६ डबल पॅनल मॉनिटरद्वारे शहरातील वाहतुकीवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांना सीसीटीव्हीच्या आधारे कायदेशीर व दंडात्मक कारवाई तसेच ई-चलन प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियमभंगाची माहिती सीसीसीमध्ये ई-स्वरूपात प्राप्त झाल्यानंतर पडताळणी करून ई-चलनाद्वारे दंड आकारला जाईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एस.टी. बसस्थानक परिसरात २०० मीटर 'नो पार्किंग झोन'ची प्रभावी अंमलबजावणी

‘या’ सिग्नलवर सीसीटीव्ही कार्यान्वित:
सरकारवाडा पोलीस स्टेशन, सीबीएस, मेहेर सिग्नल, जुना गंगापूर नाका, शरणपूर चौकी, तरणतलाव, सांगली बँक, त्र्यंबक नाका, कॅनडा कॉर्नर, गंगापूर पोलीस स्टेशन, एबीबी सर्कल, सिबल हॉटेल, जेहान सर्कल, सिटी सेंटर मॉल, बारदान फाटा, पाइपलाइन रोड, प्रसाद सर्कल, विद्या विकास सर्कल, भद्रकाली पोलीस स्टेशन, खडकाळी, मुंबई नाका पोलीस स्टेशन, गडकरी चौक, नागजी चौक, मुंबई नाका सर्कल, पंचवटी पोलीस स्टेशन, पेठ नाका, काट्या मारुती चौक, सेवाकुंज, मखमलाबाद नाका, ड्रीम कॅसल नाका, तारवाला चौफुली, नवीन मार्केट चौक, म्हसरूळ पोलीस स्टेशन, मेरी चौफुली, राऊ हॉटेल, आडगाव पोलीस स्टेशन, नांदूर नाका, मिरची चौक, सातपूर पोलीस स्टेशन, आयटीआय चौक, पपया नर्सरी, समृद्धी टी-पॉइंट, महिंद्रा सर्कल, अंबड पोलीस स्टेशन, त्रिमूर्ती चौक, नाशिकरोड पोलीस स्टेशन, विहितगाव टी-पॉइंट, बिटको चौक, उपनगर पोलीस स्टेशन, दत्तमंदिर.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. १० जून) वीजपुरवठा बंद राहणार…

अशी आहे नियंत्रण कक्षातील तयारी:

  • ६x४ फूटांची एलसीडी व्हिडिओ वॉल
  • १६ डबल पॅनल मॉनिटर
  • गुगल मॅपच्या साहाय्याने सिग्नल व वाहतूक कोंडीची माहिती
  • नियंत्रण कक्षातून थेट सूचना देण्याची सुविधा
  • सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंग उल्लंघन, बेकायदेशीर यूटर्न आदींवर ई-चलनाद्वारे दंड
  • स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात एकूण ८०० सीसीटीव्ही; त्यापैकी ४० सिग्नलवरील कॅमेरे कार्यान्वित

शहरातील वाहतूक शिस्तबद्ध ठेवण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790