Amazon

नाशिक: अनधिकृत होर्डिंग्जविरोधात आजपासून मनपाची धडक कारवाई; थेट गुन्हे दाखल होणार

नाशिक। दि. १६ नोव्हेंबर २०२६ : शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज आणि बेकायदेशीर जाहिरातबाजीला आळा घालण्यासाठी नाशिक महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. दिवाळीनंतर सोमवारपासून (दि. १६ नोव्हेंबर) शहरातील सहाही विभागांत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या कारवाईत विनापरवाना उभारलेले होर्डिंग्ज हटविण्यासोबतच संबंधित व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

नाशिक शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात येत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या होर्डिंग्जमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचण्याबरोबरच वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. तसेच काही ठिकाणी अपघातांचा धोकाही वाढत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गांत दोन दिवस महत्वाचे बदल

या पार्श्वभूमीवर महापालिकेने नाशिकरोड, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सातपूर आणि सिडको या सहाही विभागांत विशेष पथके तैनात केली आहेत. या मोहिमेत पोलीस प्रशासन आणि महापालिकेचे उपद्रव शोध पथकही सहभागी होणार आहे.

दिवाळी सणाच्या काळात कारवाई केल्यास सणाच्या उत्साहावर परिणाम होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने मोहीम पुढे ढकलली होती. मात्र, आता सण संपल्यानंतर अनधिकृत होर्डिंग्जविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १ लाख ५१ हजार पणत्यांतून साकारली भव्य प्रतिकृती

केवळ होर्डिंग्ज हटविण्यापुरती कारवाई मर्यादित राहणार नाही !:
यापूर्वी अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांना सूचना देऊन किंवा ते हटवून कारवाई केली जात होती. मात्र, आता संबंधितांवर थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे परवानगी न घेता जाहिरात फलक उभारणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर आर्थिक तसेच कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. या मोहिमेमुळे शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते मोकळे होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांना लुटणाऱ्या जुगार टोळीवर पोलिसांचा छापा; १३ जण अटकेत

अनधिकृत होर्डिंग्ज स्वतःहून हटवा:
अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ते स्वतःहून तत्काळ हटविण्याचे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने केले आहे. महापालिकेची रीतसर परवानगी न घेता उभारलेले होर्डिंग्ज हटविले नाहीत, तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790