Amazon

नाशिकमध्ये सीएनजीचे दर पुन्हा वाढले; अवघ्या १५ दिवसांत दुसरी दरवाढ

नाशिक। दि. १६ नोव्हेंबर २०२६ : इंधन दरवाढीचे सत्र सुरूच असून, नाशिककरांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेडसह अन्य गॅस कंपन्यांनी सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.५० रुपयांची वाढ केली आहे. नाशिकमध्ये गेल्या ४८ तासांपासून नवीन दर लागू झाले असून, सीएनजीचा भाव आता ९९.७५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. त्यामुळे सीएनजीच्या दरांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये १ ऑगस्ट २०२६ पासून सीएनजीचा दर ९८.२५ रुपये प्रतिकिलो इतका होता. त्यापूर्वी जुलै महिन्यात प्रतिकिलो १.१० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा १.५० रुपयांची दरवाढ झाल्याने वाहनचालकांच्या खर्चात भर पडणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाने बनावट Instagram अकाउंट; नाशिक सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्येही सीएनजीच्या दरात सोमवारपासून प्रतिकिलो २.३७ रुपयांची वाढ होणार आहे. यामुळे तेथील दर १०७.७१ रुपये प्रतिकिलोवर पोहोचणार आहेत. मुंबईसह महानगरांमध्ये गेल्या अडीच महिन्यांत सीएनजी प्रतिकिलो ५.५० रुपयांनी महागल्याची माहिती आहे.

दरवाढीमागे गॅस पुरवठ्यातील घट आणि आयातीचा वाढता खर्च:
महानगर गॅस लिमिटेडच्या स्पष्टीकरणानुसार, देशांतर्गत नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात घट झाली असून, गॅस खरेदीचा खर्चही वाढला आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीला आयात केलेल्या नैसर्गिक वायूवर अधिक अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच मध्यपूर्वेतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसच्या किमती वाढल्याचा परिणाम देशांतर्गत दरांवर होत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गॅस कनेक्शन कामाच्या बहाण्याने युवतीचा विनयभंग

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता:
विशेष म्हणजे, १ नोव्हेंबर रोजी सीएनजीच्या दरात प्रतिकिलो एक रुपयाची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत पुन्हा १.५० रुपयांची दरवाढ झाल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सीएनजीवर अवलंबून असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होणार आहे. आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या व्यावसायिक चालकांवरील आर्थिक ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. इंधन खर्च वाढल्यामुळे आगामी काळात रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीची मागणी पुन्हा जोर धरू शकते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790