Amazon

नाशिक महानगर प्रदेशात नियोजित विकासासाठी भूखंडधारकांना नगररचना योजनेत सहभागाची संधी

नाशिक। दि. २६ ऑक्टोबर २०२६: नाशिक महानगर प्रदेशातील प्रस्तावित रिंग रोड व इतर विकासक्षम परिसरात नियोजित, समन्वित आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (NMRDA) मोठ्या भूखंडधारकांकडून नगररचना योजनेत सहभागासाठी स्वारस्य अभिव्यक्ती (Expression of Interest – EOI) मागविण्यात येत आहे.

या माध्यमातून औद्योगिक, लॉजिस्टिक्स, आरोग्य, पर्यटन, निवासी व संस्थात्मक विकासासाठी नियोजनबद्ध भूखंड विकासाची संधी उपलब्ध होणार असून इच्छुक पात्र भूखंडधारकांनी प्राधिकरणाच्या www.nashikmrda.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार स्वारस्य अभिव्यक्तीचा प्रस्ताव ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसची दुचाकीला धडक; दोन जखमी

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे महानगर प्रदेशाचे नियोजन व विकास प्राधिकरण म्हणून कार्यरत असून, प्रदेशाचा सुनियोजित आणि शाश्वत विकास साधणे हे प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. प्रस्तावित नाशिक रिंग रोडमुळे महानगर प्रदेशातील संपर्कक्षमता वाढण्यासह रिंग रोडच्या परिसरात नियोजित नागरी व औद्योगिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या व सलग भूखंडांच्या समूहांची विकासक्षमता ओळखून नगररचना योजनेद्वारे नियोजित विकासाला चालना देण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आज (दि. २५) ५०१ जणांचा सामूहिक शंखनाद; विश्वविक्रमाचा प्रयत्न

नगररचना योजनेत सहभागासाठी औद्योगिक व लॉजिस्टिक्स वापराकरिता किमान १०० एकर, तर आरोग्य, पर्यटन, निवासी, मिश्र वापर व संस्थात्मक विकासासाठी किमान ५० एकर सलग क्षेत्र आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक मालक असल्यास एकूण क्षेत्राच्या किमान ८० टक्के क्षेत्रधारकांची संमती आवश्यक राहणार आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रसिद्धीच्या दिनांकापासून ४५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, आवश्यकतेनुसार १५ दिवसांची मुदतवाढ दिली जाऊ शकते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार सिंहस्थ आढावा बैठक; समांतर गंगापूररोडच्या कामाचा आज शुभारंभ

दरम्यान, स्वारस्य अभिव्यक्ती सादर केल्याने संबंधित जमीन आपोआप नगररचना योजनेत समाविष्ट होणार नाही. तसेच यामुळे भू-वापर बदल, परवानगी, चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) किंवा आरक्षणासंबंधी कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. ही प्रक्रिया निविदा नसून, यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि जमिनीचे हस्तांतरणही होणार नाही.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी NMRDA कार्यालय, राका कॉलनी, नाशिक – ४२२००२ येथे अथवा. दूरध्वनी : ०२५३-२९५९७८७, ई-मेल : nmrda.nsk@gmail.com. यावर संपर्क साधावा, असेही महानगर आयुक्त श्री. शर्मा यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790