Amazon

नाशिक: खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’मार्फत निःशुल्क ॲग्रीकल्चर ड्रोन प्रशिक्षण

नाशिक। दि. ७ ऑक्टोबर २०२६: राज्य शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ (AMRUT) च्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी निःशुल्क ॲग्रीकल्चर ड्रोन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींना ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांना कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे ‘अमृत’चे विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी कळविले आहे.

या प्रशिक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा ‘अमृत’च्या लक्षित गटातील नागरिक पात्र असतील. या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार, हिंदू वीरशैव लिंगायत, अग्रवाल आदी एकूण २६ जातींचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील ‘या’ भागांत मंगळवारी (दि. 6 ऑक्टोबर) वीजपुरवठा बंद राहणार…

प्रशिक्षण पूर्णपणे निःशुल्क असून तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष ड्रोन हाताळणी व उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, त्याद्वारे उपलब्ध होणाऱ्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी याबाबतही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणाची पहिली तुकडी २२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते ५५ वर्षे आहे. नोंदणीसाठी उमेदवारांनी फोटो, आधारकार्ड, पॅनकार्ड, तहसीलदारांनी प्रमाणित केलेला ८ लाख रुपयांच्या आतील उत्पन्नाचा दाखला, तहसीलदारांनी प्रमाणित केलेले अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) आणि एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: "नवरात्रीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासह सुरक्षा उपाययोजनांना प्राधान्य द्यावे"- जिल्हाधिकारी

अधिक माहितीसाठी मयूर (अमृत मित्र) – 8830046256 (नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर), दीपक गुप्ता – 9423476929 (मालेगाव, येवला, चांदवड, निफाड, सिन्नर) आणि अजिंक्य कनन्नल – 9665692676 (मालेगाव, मनमाड, नांदगाव) यांच्याशी संपर्क साधावा.

कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पात्र युवक-युवतींनी या निःशुल्क प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790