Amazon

नाशिक: विद्यार्थ्यांना अडवून लुटणारा संशयित चेंबूरमधून जेरबंद; २४ तासांत गुन्ह्याचा छडा

नाशिक। दि. ६ ऑक्टोबर २०२६: रिक्षातून प्रवास करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना अडवून त्यांच्यावर हल्ला करत रोख रक्कम तसेच फोन-पेच्या माध्यमातून ऑनलाइन पैसे बळजबरीने घेणाऱ्या संशयित आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने मुंबईतील चेंबूर येथून अटक केली. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास पूर्ण करत संशयिताला ताब्यात घेतले.

ही घटना ३ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास सीबीएस परिसरात घडली. तीन विद्यार्थी रिक्षातून जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी कार आडवी लावून रिक्षा थांबवली. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या जवळील सुमारे तीन हजार रुपयांची रोख रक्कम तसेच फोन-पेच्या माध्यमातून ऑनलाइन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले. यानंतर जीवे मारण्याची धमकी देत दोघेही तेथून पसार झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील ‘या’ भागांत मंगळवारी (दि. 6 ऑक्टोबर) वीजपुरवठा बंद राहणार…

या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील संशयित प्रबल संतोष नाडे (वय २४, रा. नागसेन वाडी, वडाळा नाका) हा मुंबईतील चेंबूर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: "कोणताही पात्र मतदार यादीत समावेशनापासून वंचित राहणार नाही याची मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी"

गुन्हे शाखा युनिट-२चे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ मुंबई गाठली. सायन-ट्रॉम्बे रोडवरील डोमिनोज पिझ्झा परिसरात सापळा रचून पोलिसांनी प्रबल नाडे याला वाहनासह ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार आणि मोबाइल फोनसह एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790