Amazon

नाशिक: “कोणताही पात्र मतदार यादीत समावेशनापासून वंचित राहणार नाही याची मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी”

नाशिक। दि. ५ ऑक्टोबर २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत मतदार यादीतील नोंदींची पडताळणी व आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही सुरू आहे. कोणताही पात्र मतदार मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या २६ सप्टेंबर २०२६ रोजीचे प्रसिद्धीपत्रक तसेच २९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार मतदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेल्या विविध बाबींवर कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच मतदार यादीतील ‘ नो मॅपिंग’ अथवा ‘ लॉजिकल डिसक्रेपन्सी’ असलेल्या मतदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली असल्यास, सुधारित सूचनांनुसार त्यांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची आवश्यकता नाही. मात्र, आवश्यक कागदपत्रे संबंधित बीएलओ यांच्याकडे सादर करता येतील. नोटीस प्राप्त मतदारांच्या बाबतीत मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये १८ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू; नोव्हेंबरपासून डांबरीकरणाचा वेग वाढणार

तार्किक विसंगती असलेल्या मतदारांकडून केवळ संबंधित विसंगतीशी निगडित कागदपत्रे प्राप्त करून घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच केवळ अपवादात्मक प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास किंवा उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेणे शक्य नसल्यास संबंधित मतदाराची सुनावणी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. अशा सुनावणीस संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही प्रौढ व्यक्तीस हजर राहता येईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंग गडावर ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव; १० ते २६ ऑक्टोबरपर्यंत घाट रस्ता खासगी वाहनांसाठी बंद

मतदार नोंदणीसाठी दिनांक १० व ११ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित मतदान केंद्रस्तरीय विशेष शिबिरांमध्ये नोटीस प्राप्त मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करता येणार आहेत. बेघर मतदार, कामगार, गरीब व्यक्ती, आदिवासी समाजातील विशेषतः पीव्हीटीजी गटातील व्यक्ती, अनाथ घटकातील मतदार तसेच अनुसूचित जमातीतील मतदारांसाठी मदत कक्ष व विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
 
तसेच पुरावे उपलब्ध नसलेल्या किंवा प्राप्त कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेता न येणाऱ्या प्रकरणांमध्ये पुढील कार्यवाही करण्यापूर्वी मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी संधी देणे, सुनावणी घेणे व आदेश पारित करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यानुषंगाने मतदारांशी संपर्क साधण्यासाठी व आवश्यक कागदपत्रे जमा करून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींमध्ये समन्वय ठेवण्यात येणार आहे. सर्व संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना सहकार्य करावे, असेही आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी. डॉ. सरदेसाई यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790