Amazon

नांदगावच्या आठवडे बाजारातील भेळभत्त्यामुळे विषबाधेचा संशय; १४० हून अधिक रुग्ण रुग्णालयात

मालेगाव। दि. २८ सप्टेंबर २०२६: नांदगाव बुद्रुक येथील आठवडे बाजारात भेळभत्ता खाल्ल्यानंतर चिंचावड, गुंजाळवाडी, नांदगाव बुद्रुक आणि डोंगरगाव येथील नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार भेळभत्त्यातून विषबाधा झाल्याचा संशय असून, १४० हून अधिक रुग्णांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बाधितांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

भेळभत्ता खाल्ल्यानंतर नागरिकांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर रुग्णांना तातडीने मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने परिस्थिती हाताळण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेसोबतच खासगी डॉक्टरही मदतीसाठी पुढे आले आहेत. काही रुग्णांना महिला रुग्णालयातही संदर्भित करण्यात आले असून, तेथेही उपचार सुरू आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आज (दि. २७) मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, सध्या कोणीही गंभीर नसल्याची माहिती अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. मोमीन यांनी दिली. बाधित रुग्णांना २४ तास वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार उपचार केले जात आहेत.

दरम्यान, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगावच्या सामान्य रुग्णालयात जाऊन बाधित रुग्णांची भेट घेतली. त्यांनी रुग्णांची विचारपूस करून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. सर्व रुग्णांना आवश्यक ते उपचार तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रविवार असूनही आज बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप

या घटनेची सखोल चौकशी करून विषबाधेचे नेमके कारण शोधण्यात येणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. तसेच, तपासात दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790