Amazon

सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा: पर्वणीला १९० रुग्णवाहिका सज्ज, ३,६०० अतिरिक्त मनुष्यबळ तैनात होणार

नाशिक। दि. २३ सप्टेंबर २०२६: सिंहस्थ महाकुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन उपचाराची सुविधा केवळ रुग्णालयांपुरती मर्यादित न ठेवता भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणीच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

साधुग्राम, पार्किंग, घाट, होल्डिंग व स्टेजिंग एरिया तसेच प्रमुख मार्गांच्या परिसरात मिळून १३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारल्या जाणार असून, पर्वणीच्या काळात १९० रुग्णवाहिका तैनात राहणार आहेत. या विस्तारित आरोग्य व्यवस्थेसाठी ३,६०० अतिरिक्त वैद्यकीय व निमवैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सिंहस्थाच्या आरोग्यविषयक तयारीसाठी महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि प्रादेशिक संदर्भ रुग्णालय यांच्या २६० कोटी रुपयांच्या आरोग्य आराखड्यांना नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून मंगळवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तात्पुरती रुग्णालये व दवाखाने, रुग्णवाहिका, अतिरिक्त मनुष्यबळ, आयसीयू क्षमता, औषधे, वैद्यकीय उपकरणे, रोगनियंत्रण आणि डिजिटल आरोग्य निरीक्षण अशा विविध बाबींचा या आराखड्यांत समावेश आहे.

“सिंहस्थाच्या काळात भाविकांना त्यांच्या जवळच वैद्यकीय सेवा मिळावी, गरज भासल्यास रुग्णांना कमीत कमी वेळेत पुढील उपचारासाठी हलविता यावे आणि वाढलेल्या रुग्णसंख्येला सामावून घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम असावी, या उद्देशाने विविध विभागांच्या क्षमतांचे एकत्रित नियोजन करण्यात आले आहे,” असे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: घराची किल्ली न सापडल्याच्या कारणावरून १९ वर्षीय पत्नीची हत्या; २१ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा

गर्दीच्या ठिकाणी १३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा:
सिंहस्थाच्या काळात विविध ठिकाणी एकूण १३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारण्यात येणार आहेत. यामध्ये तात्पुरती रुग्णालये, आयसीयू आणि दवाखान्यांचा समावेश आहे.

साधुग्राम, पार्किंग परिसर, घाट, होल्डिंग व स्टेजिंग एरिया, बाह्य पार्किंग तसेच प्रमुख मार्गांच्या परिसरात या सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामुळे किरकोळ आजार, दुखापत किंवा प्राथमिक उपचारांची गरज असलेल्या भाविकांना मुख्य रुग्णालयापर्यंत जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे.

या सुविधा पोर्टा-कॅबिन स्वरूपात उभारल्या जाणार असून, त्यामध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पर्वणीला १९० रुग्णवाहिका:
भाविकांना आवश्यकतेनुसार तातडीने पुढील उपचार केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी १९० रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट (ALS) आणि बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) रुग्णवाहिकांचा समावेश असेल.

रुग्णालये, तात्पुरती आरोग्य केंद्रे, घाट, साधुग्राम, पार्किंग, होल्डिंग व स्टेजिंग एरिया, प्रमुख मार्ग आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी या रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत.

विविध आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यात आले असून, खरेदी तसेच भाडेतत्त्वावरील वाहनांचा त्यात समावेश आहे. खरेदी केलेल्या रुग्णवाहिका सिंहस्थानंतरही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत वापरल्या जाणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, कामाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करा : आयुष प्रसाद

डॉक्टर, परिचारिका आणि इतर ३,६०० कर्मचारी:
वाढीव आरोग्य सुविधांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. चार आरोग्य यंत्रणांच्या आराखड्यांनुसार एकूण ३,६०० अतिरिक्त वैद्यकीय व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

यामध्ये विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस व बीएएमएस डॉक्टर, परिचारिका, एएनएम, औषधनिर्माते, वैद्यकीय तंत्रज्ञ आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे मनुष्यबळ तात्पुरत्या आरोग्य सुविधा चालविण्यासोबतच विद्यमान रुग्णालयांवरील वाढीव भार हाताळण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

सिंहस्थापूर्वी या कर्मचाऱ्यांना मोठ्या गर्दीच्या काळातील रुग्ण व्यवस्थापन, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि समन्वयाबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

१,९४५ खाटांची एकत्रित उपचार क्षमता:
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर विविध आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून रुग्णालयीन उपचार क्षमता वाढविण्यात येणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या १,३०५ खाटांमध्ये आणखी ६४० खाटांची भर पडणार असून, सिंहस्थाच्या काळात एकूण १,९४५ खाटांची उपचार क्षमता उपलब्ध होणार आहे. यामध्ये १८५ आयसीयू खाटांचा समावेश असेल. त्यामुळे नियमित उपचारांसोबतच सिंहस्थाच्या काळातील वाढीव रुग्णसंख्या हाताळण्यासाठी रुग्णालयांना अतिरिक्त क्षमता मिळणार आहे.

विद्यमान रुग्णालयांची उपचारक्षमताही वाढविण्यात येणार:
सिंहस्थाच्या पर्वणीदरम्यान रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यमान रुग्णालयांची उपचारक्षमताही वाढविण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  डॉ. मनीषा आत्महत्या प्रकरण : डॉ. जेजूरकर, डॉ. स्वाती चव्हाण यांची कारागृहात रवानगी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय आणि आरोग्यशाळा रुग्णालय या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये ७३ अतिरिक्त आयसीयू खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे या चार रुग्णालयांची एकत्रित आयसीयू क्षमता १७ वरून ९० खाटांपर्यंत, तर एकूण खाटांची क्षमता ३५० वरून ५५० पर्यंत वाढणार आहे.

आरोग्य यंत्रणांमधील या मनुष्यबळाचे नियोजन आणि विविध सुविधांमधील समन्वय यावर अतिरिक्त कुंभमेळा आयुक्त प्रमोद पवार यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांकडून काम सुरू आहे.

आजारांचे डिजिटल निरीक्षण:
सिंहस्थाच्या काळात विविध भागांत नोंदवल्या जाणाऱ्या आजारांची माहिती डिजिटल पद्धतीने संकलित करून रोगनिहाय निरीक्षण करण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे. यामुळे एखाद्या भागात विशिष्ट आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यास त्याचा वेळेत मागोवा घेता येणार आहे.

रुग्णवाहिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस आधारित ट्रॅकिंग, आरोग्य केंद्रांमधील डिजिटल नोंदणी आणि आपत्कालीन संपर्क व्यवस्थेचाही आराखड्यात समावेश आहे.

पोर्टेबल वैद्यकीय युनिट्सही तैनात:
सिंहस्थाच्या काळात गरजेनुसार विविध ठिकाणी तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता यावी, यासाठी तीन पोर्टेबल आपत्कालीन वैद्यकीय युनिट्स उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. आवश्यकतेनुसार ही युनिट्स गर्दीच्या किंवा इतर गरजेच्या ठिकाणी तैनात करून तेथेच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790