नाशिक। दि. १९ सप्टेंबर २०२६: पोलीस असल्याची बतावणी करून दोघा भामट्यांनी एका ५३ वर्षीय व्यक्तीला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या लंपास केल्याची घटना पाथर्डी-वडनेर रोडवर घडली.
पाथर्डी गावातील रहिवासी असलेले फिर्यादी काल (दि. १८) सकाळी सुमारे सात वाजता पाथर्डी-वडनेर रोडने पाथर्डीच्या दिशेने पायी जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या एका इसमाने त्यांना रस्त्यात अडवले. आपण पोलीस असल्याचे सांगत त्याने फिर्यादीशी संवाद साधण्यास सुरुवात केली.
दरम्यान, त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने फिर्यादीला रुमाल दिला. त्यांच्या उजव्या हातातील २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या काढून रुमालात ठेवण्यास सांगण्यात आले. फिर्यादीने अंगठ्या रुमालात ठेवल्यानंतर या दोघांनी रुमालासह सोन्याच्या अंगठ्या स्वतःच्या ताब्यात घेतल्या.
यानंतर भामट्यांनी फिर्यादीच्या हातात अंगठ्या नसलेला दुसराच रुमाल ठेवला आणि मोटारसायकलवरून पाथर्डीच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोन तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस हवालदार पगारे करीत आहेत.
![]()


