नाशिक। दि. ९ सप्टेंबर २०२६: आगामी कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडाकडे जाणाऱ्या घाटरस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी सप्तशृंगी गड ते नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मीरा संखे यांच्या आदेशानुसार, १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजेपासून २६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हा घाटरस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
घाटमार्गावर प्रत्यक्ष काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना वाहतूक सुरू ठेवल्यास कामाच्या गुणवत्तेवर तसेच गतीवर परिणाम होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या मार्गाला तत्काळ पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१७ दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन:
सप्तशृंगी गड हा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून येथे वर्षभर मोठ्या संख्येने भाविक येतात. आगामी कुंभमेळा २०२७च्या तयारीचा भाग म्हणून घाटरस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. त्यासाठी सलग १७ दिवस वाहतूक बंद ठेवून काम पूर्ण क्षमतेने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
![]()


