
नाशिक। दि. ३१ ऑगस्ट २०२६: सिटीलिंक शहर बसमध्ये प्रवाशांची गर्दी असताना चढण्याच्या बहाण्याने एका प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली. दोन्ही संशयित जालना जिल्ह्यातील असून, त्यांच्याकडून चोरीची सुमारे आठ हजार रुपये किमतीची सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
राजेंद्र ज्ञानदेव जाधव (वय: ५५, राहणार: मेडशिंगी, ता. पाथर्डी, जि: अहिल्यानगर) आणि शरद श्रीरंग जाधव (वय: ४२, राहणार: वाघलखेडा, ता. अंबड, जि. जालना) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंचवटी कारंजा येथील सिटीलिंक बसथांब्यावर प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यावेळी संशयितांनी बसमध्ये चढण्याचा बहाणा करून गर्दीचा फायदा घेत एका प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली होती. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-२कडून सुरू होता. तपासादरम्यान बसमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, गर्दीत दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आल्या. फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली.
तपास पथकाने दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, गर्दीचा गैरफायदा घेत प्रवाशांच्या अंगावरील दागिने चोरल्याची कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोघांना पुढील तपासासाठी अंबड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
![]()


