नाशिक। दि. ३१ ऑगस्ट २०२६: नाशिक जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून या मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र मतदारांनी तसेच दावे व हरकती असलेल्या नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावे व हरकती दाखल कराव्यात. तसेच १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकास किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रांसह नमुना ६ भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे व लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मधुमती सरदेसाई उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या ASDD मतदारांची यादी, त्यामध्ये नाव समाविष्ट न होण्याची संभाव्य कारणांसह संबंधित मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तहसीलदार कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच नाशिक जिल्ह्याच्या https://nashik.gov.in/ या संकेतस्थळावर नागरिकांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुषंगाने नाशिक जिल्ह्यातील कोणताही पात्र मतदार मतदार यादीत नाव येण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नसलेल्या मतदारांना किंवा १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना या कालावधीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ भरता येईल. मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८, तर संबंधित मतदारसंघातील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरून हरकत दाखल करता येईल. संबंधित अर्ज https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध आहेत. तसेच मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा अथवा विधान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ नुसार संबंधित व्यक्तीस एक वर्षापर्यंतची शिक्षा, दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.
दावे व हरकती दाखल करताना एकाच अर्जात अनेक व्यक्तींचे वैयक्तिक दावे अथवा हरकती सादर करता येणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे दावा किंवा हरकत दाखल करणे आवश्यक आहे. मात्र, एकाच घरातील अर्थात एकाच कुटुंबातील सदस्यांशी संबंधित वैयक्तिक दावे अथवा हरकती एकत्रितपणे सादर करता येतील.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, नावातील किंवा अन्य तपशीलातील दुरुस्ती करणे तसेच अपात्र किंवा चुकीच्या नोंदींबाबत हरकत नोंदविता येणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव तपासावे. विशेषतः प्रथमच मतदान करणारे युवक-युवती, स्थलांतरित मतदार तसेच मतदार यादीतील तपशीलामध्ये बदल झालेल्या नागरिकांनी यादीची पडताळणी करावी.
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य देण्यात येत आहे. मतदार यादीतील नोंदींची तपासणी करताना आढळणाऱ्या त्रुटी, विसंगती अथवा हरकतींबाबत संबंधितांना योग्य संधी देण्यात येणार आहे. राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. तसेच SIR प्रक्रियेंतर्गत मोठ्या प्रमाणावर गणनापत्रक वितरित करण्यात आले असून, BLO पासून पुढील स्तरापर्यंतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर नोंदणी व पडताळणीची प्रक्रिया करण्यात येत आहे. मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी यावेळी तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विसंगती, ओळखविषयक माहिती, वयातील तफावत तसेच समान छायाचित्रांच्या नोंदी यांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे केवळ गणनापत्रक भरून घेण्यापुरती ही प्रक्रिया मर्यादित नसून, प्राप्त माहितीची तांत्रिक पद्धतीने पडताळणी केली जात आहे.
राष्ट्रीय पक्षांच्या बैठका घेऊन मतदार यादीची तपासणी करण्यासाठी त्यांच्या जिल्हा, महिला, युवा तसेच इतर घटकांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरापासून मतदारसंघस्तरापर्यंतच्या बैठकींमध्ये संबंधित प्रतिनिधींनी सहभागी होऊन प्रक्रिया समजून घ्यावी. तसेच आवश्यक हरकती अथवा सूचना प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
SIR प्रक्रियेदरम्यान ज्या मतदारांना नोटीस बजावण्याची आवश्यकता असेल, त्यांना नियमानुसार नोटीस देण्यात येईल. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली बाजू मांडावी. कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणावर किंवा अनियमित पद्धतीने नोंदी वगळण्याची प्रक्रिया सुरू नसून, प्रत्येक बाब नियमानुसार तपासली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील मतदार यादी पुनरावलोकनाची प्रक्रिया अचूक व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक गाव, प्रभाग आणि मतदान केंद्राच्या स्तरावर प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.
नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून आपले नाव व मतदार यादीतील तपशील योग्य असल्याची खात्री करावी आणि आवश्यक असल्यास विहित कालावधीत दावे व हरकती दाखल कराव्यात. तसेच ज्या राजकीय पक्षांनी अद्यापपर्यत बीएलएची नेमणूक केली नाही, त्यांनी बीएलएची नेमणूक करावी, असेही आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
![]()


