नाशिक: गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई

नाशिक। दि. २५ ऑगस्ट २०२६: कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने वडाळागावातील साठेनगर परिसरात कारवाई केली. पोलिसांनी पिकअप वाहन अडवून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, वाहनातील पाच गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी रिझवान सुलेमान कुरेशी (वय ३१, रा. भारतनगर) आणि अनीस अब्दुल्ला कुरेशी (वय ३९, रा. गंजमाळ) यांच्याविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पिकअप वाहन, दोन लोखंडी चाकू, लोखंडी कुऱ्हाड, लाकडी दांडा आणि दोन मोबाइल असा एकूण ७ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.. कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या...

साठेनगर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी गोवंश आणला जाणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाला रविवारी (दि. २३) पहाटे मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. त्यानंतर संशयास्पद पिकअप वाहन आढळून आल्यानंतर पोलिसांनी ते अडवून तपासणी केली असता त्यामध्ये पाच गोवंशीय जनावरे आढळून आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेत उपाययोजना व उत्पन्नवाढीवर भर द्यावा- व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे

ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केली असता, ही जनावरे मोहसीन कुरेशी (रा. चौकमंडई) याच्या सांगण्यावरून कत्तलीच्या उद्देशाने आणल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात मोहसीन कुरेशीसह संबंधित जागेचा मालक रेहान शेख आणि जीपचालक माल्या यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत मंगळवारी (दि. २५) वीजपुरवठा बंद राहणार !

पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, गुलाब सोनार, प्रदीप नन्नवरे, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले आणि जितेंद्र वजीरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास इंदिरानगर पोलिसांकडून सुरू आहे. (इंदिरानगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४४८/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790